कृष्णा योजनेच्या गळतीला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा योजनेच्या गळतीला ब्रेक
कृष्णा योजनेच्या गळतीला ब्रेक

कृष्णा योजनेच्या गळतीला ब्रेक

sakal_logo
By

कृष्णा योजनेच्या गळतीला ब्रेक
मनपा प्रशासनाचा उपाय ठरला यशस्वी; इचलकरंजीत पाणीपुरवठा सुरळीत

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ ः कृष्णा योजनेची जलवाहिनी आणि गळती हे समिकरण अनेक वर्षे बनले आहे. सातत्याने लागणाऱ्या गळतीमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो. परिणामी, नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासनाला सामोरे जावे लागते. या योजनेची उर्वरीत जलवाहिनी बदलण्याशिवाय पर्याय नाही. पण समोर उन्हाळा असल्याने तूर्तास महापालिका प्रशासनाने गळतीच्या संकटावर एक उपाय शोधला आहे. हा उपाय यशस्वी ठरल्यामुळे तीन आठवडे जलवाहिनीला एकही गळती लागलेली नाही. त्यामुळे शहरातील दोन दिवड आड पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणी पुरवठा केला जातो. या योजनेची जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे बहुतांशी जलवाहिनी बदलली आहे. तथापि, मजरेवाडी उपसा केंद्र, शिरढोण - टाकवडे परिसर आणि शहरात जलवाहिनी जुनीच आहे. ही जलवाहिनी पूर्णतः जीर्ण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्यास या जलवाहिनीला लगेच गळती लागते. गेल्या महिन्यात शिरढोणजवळ मोठी गळती लागली. या ठिकाणची जलवाहिनी इतकी जीर्ण झाली आहे की सतत गळती लागत असल्यामुळे प्रशासन हैराण झाले होते. त्यासाठी चक्क ३० मिटर नविन जलवाहिनी टाकली. त्यासाठी आठवडाभर कृष्णा नदीतून पाणी उपसा बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यामुळे शहरात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती.
दरम्यान, गळतीच्या संकटातून मुक्तता होण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत होते. यामध्ये पाण्याच्या दाबामुळे गळती लागत असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले. त्यावर उपाय म्हणून पाण्याचा दाब कसा कमी होईल, याबाबत विचार केला. त्यानुसार कृष्णा नदीवरील मजरेवाडी उपसा केंद्रातील दोन पैकी एक उपसा बंद ठेवला. दोन्ही उपसा पंप ५४० एचपीचे आहेत. यातील एकच उपसा पंप सुरु ठेवल्यामुळे पाण्याचा दाब कमी राहिला. परिणामी, गेली तीन आठवडे जलवाहिनीला एकही गळती लागल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे शहरात दोन दिवस आड सुरळीत पाणी पुरवठा सुरु आहे. सततच्या गळतीच्या संकटामुळे हैराण झालेल्या महापालिका प्रशासनाला तुर्तास तरी दिलासा मिळाल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले आहे.
----------
केवळ ३४ एमएलडी पाणी उपलब्ध
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा, पंचगंगा आणि कट्टीमोळा डोह येथून दररोज केवळ ३४ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. प्रत्यक्षात दररोज शहराला ५४ एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. पण त्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध होत असल्यामुळे शहरात दोन दिवड आड पाणी पुरवठा केला जात आहे. कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलल्यानंतर मात्र पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे. यासाठी शासनाने नुकताच निधी मंजूर केला आहे.