जलदिन विशेष

जलदिन विशेष

लोगो - जागतिक जल दिन विशेष

छोट्या-छोट्या कृतीतून पाण्याची बचत
सजगता वाढली; वैयक्तिक, अपार्टमेंटच्या पातळीवर प्रयोग यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : उन्हाळा पडू लागल्यानंतर बऱ्याच वेळेला पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केल्या जातात. पाणी बचतीवर चर्चा होऊ लागते. मात्र, पाण्याचे महत्त्व जाणत वर्षभर छोट्या-छोट्या कृतीतून पाण्याची बचत करणाऱ्या सजग नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. स्वयंपाकासाठी लागणारा भाजीपाला, तांदूळ धुतलेले पाणी झाडांना घालणे, आठवड्यातून एकदा तेही कमी पाण्याने गाडी धुणे, शॉवरचा वापर न करणे आणि नळातून कमी पाणी यावे यासाठी नळाला बूच वापरणे, अशा कृतीतून पाणी बचतीचे संदेश काहीजण देत आहेत.
पाणी साठवणुकीच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकते. त्यामध्ये हवा जास्त व पाण्याचे प्रमाण कमी असते. पाण्याच्या तुषारावर स्वच्छता होऊ शकते, याचा दाखला शहरातील अनेक अपार्टमेंट देत आहेत. तर महाद्वार रोड, पापाची तिकटी परिसरातील गाळेधारकही दारातील स्वच्छता याप्रमाणेच करू लागले आहेत. त्याप्रमाणेच पावसाळ्यात पडणारे पाणी पुन्हा जमिनीत मुरविण्यासाठी अपार्टमेंटनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय वापरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टँकर मागवण्याची वेळ येत नाही. यातून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवल्याचा आनंद त्यानिमित्ताने मिळतो.
----------------
चौकट
हँडवॉश स्टेशनचे पाणी बागेला
टेंबलाईवाडी विद्यालयात असाच एक पाणी बचतीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. हँडवॉश स्टेशनचे पाणी झाडांना जाईल, अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण केली आहे, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही आणि पाण्याचा विनियोग करता येईल.
-------
कोट
मी जेव्हा भाज्या, डाळी आणि तांदूळ स्वयंपाकासाठी धुते त्यावेळी हे पाणी बागेतील झाडांना घालते. शिवाय माझी गाडी आठवड्यातून एकदा धुते. इतर वेळी कापडाने गाडी स्वच्छ करते. यातून पाणी बचतीतून छोटेसे प्रयत्न करते.
- वैशाली सावंत
------------
दररोज भाजी करण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाणी वापरते. जवळपास लिटरभर पाणी त्यात जाते. ते कुंड्याना किंवा झाडांना वापरते. तसेच झाडांना पाणी घाताना झाडांच्या मुळांना पाणी पोहोचेल, अशा पद्धतीने पाणी घालते. उगाचच पाण्याचा अपव्यय करत नाही.
- संगीता कोकितकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com