
पानसरे सुनावणी- साक्षीपुरावे सुरू- कपडे ओळखले
लोगो
...
90550
------
पानसरे दाम्पत्याचे रक्ताने माखलेले कपडे पंचांनी ओळखले
प्रत्यक्षात साक्षीपुराव्यांना सुरुवात ः पुढील सुनावणी तीन एप्रिलला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येवेळी दाम्पत्याचे रक्ताने माखलेले कपडे आज पंच साक्षीदारांनी न्यायालयात ओळखले. पानसरे हत्या खटल्याची सुनावणी आज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (तीन) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात झाली. खटल्यात साक्षीपुराव्यांच्या पहिल्याच दिवशी दोन्ही पंच साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणीसुद्धा झाली. दिवसभर हे कामकाज चालले. पुढील सुनावणी तीन एप्रिलला होणार आहे.
पानसरे दाम्पत्यावर त्यांच्या घरासमोरच मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर गोळीबार झाला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी परिसरातील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचे कपडे जप्त केले होते. यावेळी पंच साक्षीदार म्हणून इम्तियाज नूरमहंमद हकीम (वय ४७, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि सादिक सिराज मुल्ला (४२, रा. सुभाषनगर, सिरत मोहल्ला, कोल्हापूर) उपस्थित होते. त्यांची साक्ष आज विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतली. यावेळी न्यायालयात दाखविलेले पानसरे दाम्पत्याचे रक्ताने माखलेले कपडे ओळखत असल्याचे दोन्ही पंच साक्षीदारांनी सांगितले. तसेच पुढे सुनावणीत ॲड. निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंच साक्षीदारांनी उत्तर देत पंचनाम्याचा घटनाक्रमही सविस्तर सांगितला.
दरम्यान, उलट तपासणीमध्ये संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी पंच साक्षीदारांकडून प्रश्नांच्या माध्यमातून तपासातील बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंच साक्षीदारांच्या नावापासून ते पंचनाम्यातील बारकाव्यांपर्यंत अनेक प्रश्न विचारले. यावेळी दोन्ही बाजूंचे वकील, साक्षीदार, संशयित आरोपीसुद्धा न्यायालयात हजर होते.
साधारण दुपारी बाराच्या सुमारास हकीम यांची साक्ष सुरू झाली. त्यानंतर तातडीने झालेली उलटतपासणी सुमारे पावणेदोनला संपली. त्यामुळे दुसऱ्या सत्रात पुढील कामकाज ठेवण्यात आले. दुपारी तीनला मुल्ला यांची साक्ष सुरू झाली. त्यानंतर तातडीने उलटतपासणी झाली. यासाठी साधारण पावणेपाचपर्यंत कामकाज चालले. सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी कामकाज पाहिले. सुनावणीसाठी गुन्ह्यातील सर्व बारा संशयित आरोपींना मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते.
दरम्यान, दिवसभराच्या सुनावणीत साक्षीपुरावे सुरू झाल्यानंतर कपडे जप्त केल्याच्या मुद्द्यावरून विशेष सरकारी वकील आणि संशयित आरोपींचे वकील यांच्यात शाब्दिक वाद झाला.
-----------
कडक बंदोबस्त आणि कारागृह
पानसरे हत्या खटल्यातील चार संशयित हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याही हत्या खटल्यातील आहेत. त्यामुळे ते सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात असतात. त्यांना या खटल्यासाठी पुण्यातून कालच (ता.२०) कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणले. तसेच कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबर्गी यांच्या हत्या खटल्यातील आठ संशयितांनासुद्धा बंगळूरहून कोल्हापुरात आणले जाते. त्यामुळे त्यांना एक दिवस अगोदरच कळंबा कारागृहात आणले होते. तसेच उद्या किंवा परवा त्यांना तेथून पुन्हा त्यांच्या कारागृहात पाठविण्यात येणार आहे.
-----------
दुभाषक म्हणून ॲड. एन. जी. कुलकर्णी हजर
संशयित आरोपींच्या वकिलांनी गतवेळी न्यायालयात दुभाषकाची मागणी केली होती. त्यानुसार आज न्यायालयात दुभाषक म्हणून ॲड. एन. जी. कुलकर्णी हजर होते. त्यांनी मराठी येत नसलेल्या संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना कन्नडमधून सुनावणीतील माहिती दिली.