
सांस्कृतिक कोल्हापूर
सांस्कृतिक कोल्हापूर
82963
‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकातील क्षण.
‘गगन दमामा बाज्यो’चा
उद्या रौप्यमहोत्सवी प्रयोग
कोल्हापूर, ता. २१ : येथील काफिला थिएटर्स या संस्थेच्या पियूष मिश्रा लिखित ‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग गुरुवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. सरदार भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित असलेले हे संगीतमय नाटक मूळ हिंदी भाषेत लिहिलेले असून सतीश तांदळे यांनी मराठी अनुवाद केला आहे, याबाबतची माहिती आज अभिनेता आनंद काळे, समीर पंडितराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शहिद दिनानिमित्त होणाऱ्या या प्रयोगाला विनामूल्य प्रवेश असेल.
सरदार भगतसिंगचे देशप्रेमाचे विचार व त्याच्यासोबत असणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांची गाथा सांगणारे हे नाटक मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच कोल्हापूरचा युवा दिग्दर्शक शंतनू पाटील याच्या दिग्दर्शनाखाली तीस कलाकार व वादकांचा संच घेऊन सादर केले. ऋषिकेश देशमाने याने चालबद्ध केलेली व स्वतः गायलेली नाटकातील गाणी, प्रसंगानुरूप असलेले संगीत नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. शासनाबरोबरच विविध नाट्य महोत्सवात या नाटकाने अनेक बक्षिसांची लयलूट केली आहे. रौप्यमहोत्सवी प्रयोगाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
--------------
९०५७५
‘दळवीज्''च्या प्रिंटस्
प्रदर्शनासाठी नेदरलॅंडला
कोल्हापूर : चित्रकार प्रतीक्षा व्हनबट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दळवीज आर्टस् इन्स्टिट्यूटमध्ये नुकतीच प्रिंट मेकींग कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील १९ विद्यार्थी सहभागी झाले. त्यांच्या एकवीस प्रिंट साईज प्रिंट नेदरलॅंड येथील प्रदर्शनासाठी पाठवण्यात आली. प्राचार्य अजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली.
-----------
मंगलधाममध्ये
सोमवारपासून गीतरामायण
कोल्हापूर : येथील ब्राम्हण सभा करवीर आणि स्वरब्रम्ह संस्थेतर्फे रामनवमीनिमित्त सोमवार (ता.२७) पासून सलग चार दिवस गीतरामायण मैफल रंगणार आहे. मंगलधाममध्ये रोज सायंकाळी साडेपाचला मैफलीला प्रारंभ होईल. सुधीर जोशी, रोहित जोशी, गिरीष कुलकर्णी, अनुजा नाईक, चित्रा कुलकर्णी, माधवी देशपांडे, ज्येष्ठा गाडगीळ, पोर्णिमा टोपकर, राधिका ठाणेकर, निखिल जोशी, सविता शिपूरकर, नम्रता कामत, रविराज पोवार, श्रीधर जोशी, सई जोशी यांचा स्वरसाज असेल. शिल्पा पातकर यांचे निवेदन तर विजय पाटकर, रेवा गाडगीळ, परेश गाडगीळ, केदार गुळवणी, नरेंद्र पाटील यांची साथसंगत असेल. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असेल.
---------------
90586
कोल्हापूर : माझं घर, माझा गड’ मोहिमेंतर्गत प्रबोधनात्मक व्हिडिओतील एक प्रसंग.
‘माझं घर माझा गड’
अभियानाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. २१ : येथील काही कलाकारांनी एकत्रित येवून आता ‘माझं घर माझा गड'' अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत तयार केलेला प्रबोधनात्मक व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून गड-किल्ले संवर्धनासाठी आता ही सारी मंडळी काम करणार आहेत.
ज्या गड-किल्ल्यांना मिळवण्यासाठी आणि बांधण्यासाठी असंख्य मावळ्यांचे रक्त सांडले त्यांचे जतन आपण खरेच करतो का, असा सवाल या व्हिडिओतून विचारला आहे. आपले घर आपण जसे जपतो, तसेच गड-किल्ल्यांचे जतन केले पाहिजे, असा संदेशही त्यातून दिला गेला आहे. अभिनेता अमोल नाईक, राकेश शहा, सचिन वाडकर, विशाल नाईक, मोहन गोंजारी, शंतनु उंट, विनायक कूंभार, महेश खैरमोडे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच पुढील कृती आराखडा जाहीर केला जाणार आहे.