
जिल्हा परिषद गजबजली
जिल्हा परिषद गजबजली,
मार्चअखेरमुळे धावपळ सुरु
कोल्हापूर, ता.२१: मागील आठ दिवसांपासून जुनी पेन्शन मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. कर्मचारी कामावर नसल्याने अभ्यागतांनीही जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवली होती. मात्र सोमवारी संप मागे घेण्यात आल्यानंतर मंगळवारी (ता.२१) जिल्हा परिषदेत पुन्हा गर्दी उसळल्याचे पहायला मिळाले.
आर्थिक वर्षाची सांगता ३१ मार्चला होणार आहे. त्यामुळे मार्चअखेर मंजूर झालेला निधी खर्च करण्यासाठी नियोजन सुरु आहे. संप असल्याने हे सर्व कामकाज ठप्प झाले होते. मात्र संप मिटल्यानंतर मंगळवारी निविदा प्रक्रिया राबवणे, निधी मंजुरीच्या फाईल मंजूर करणे यासाठी जिल्हा परिषदेत धावपळ सुरु असल्याचे पहायला मिळाले. बांधकाम, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत विभागाप्रमाणेच इतर विभागातही कामाची गडबड दिसून आली.
जिल्हा नियोजन मंडळातून विकासकामांना निधी मंजुरीस विलंब झाला आहे. यातच कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. यामुळे निधी मंजूर होवूनही पुढील कार्यवाही झाली नाही. आता मार्च अखेरीस केवळ ९ दिवस राहिले आहेत. ततूपुर्वी मंजूर निधी जिल्हा परिषदेकडे जमा करुन घेणे आवश्यक आहे. तसेच किमान निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाचे आदेश देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार व कर्मचारी धावपळ करत आहेत.