
पोलिस वृत्त एकत्रित
रंकाळ्यात बुडणाऱ्या
दाम्पत्यास वाचविले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : रंकाळा तलावाच्या संरक्षण भिंतीवर बसून बोलत असताना तोल जाऊन पडल्याने पत्नी पाण्यात पडली. तिला सावरताना पतीचाही तोल जाऊन तोही पडला. मात्र, स्थानिकांनी दोघांनाही बुडताना वाचविले. पूजा निखिल कोरडे (वय ३०) आणि निखिल विकास कोरडे (वय ३५, दोघेही रा. गिरणी कॉर्नर, बुधवार पेठ) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने त्यांना पाण्यातून बाहेर काढले. दोघांवर सीपीआरमध्ये उपचार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
.............................
गॅस गळतीचा भडका;
उत्रेत बाप-लेक जखमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः गोबर गॅसच्या पाईपमधून गॅसची गळती झाल्याने भडका उडून बाप आणि मुलगी जखमी झाले. उत्रे (ता. पन्हाळा) येथे रविवारी (ता.१९) सकाळी ही घटना घडली. त्यानंतर जखमी सखाराम बाबूराव पाटील (वय ४०) आणि रिद्धी सखाराम पाटील (५, रा. उत्रे) यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना आज सीपीआरमध्ये दाखल केले. त्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. पोलिसांनी सांगितले की, पत्नी कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर सखाराम पाटील मुलीसाठी चहा बनवत होते. त्यावेळी अचानक शेगडीजवळ गॅस पाईपला गळती लागली. त्यातून भडका उडून बाप आणि मुलगी जखमी झाली.
.......................
तणनाशक प्यायलेल्या
मुदाळच्या तरुणाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : तणनाशक प्यायल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलेल्या मुदाळ (ता. भुदरगड) येथील तरुणाचा आज मृत्यू झाला. विनायक पांडुरंग पाटील (वय २७, रा. मुदाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने सोमवारी (ता.२०) दुपारी तणनाशक प्यायले होते. त्यानंतर त्याच्यावर मुदाळ तिट्टा येथे प्रथमोपचार करून त्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाल्याचे सीपीआर पोलिस चौकीतून सांगण्यात आले.
.................