इचल : सुळकूड पाणी योजना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : सुळकूड पाणी योजना निवेदन
इचल : सुळकूड पाणी योजना निवेदन

इचल : सुळकूड पाणी योजना निवेदन

sakal_logo
By

90618
सिंचनाच्या थेंबालाही धक्का नाही
दूधगंगा योजना अंमलबजावणी कृती समिती; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
इचलकरंजी, ता. २१ ः सिंचनाच्या पाण्याच्या एका थेंबालाही धक्का लागणार नाही. गैरसमजातून इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या दूधगंगा नळपाणी योजनेला विरोध होत आहे. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाने संबंधितांचा गैरसमज दूर करुन योजना कार्यान्वित होण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा मागणी दूधगंगा योजना अंमलबजावणी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. समिती शिष्टमंडळाने मंगळवारी त्यांना निवेदन देऊन चर्चा केली. यासंदर्भात बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.
इचलकरंजीसाठी दूधगंगा (सुळकूड उद्भव) पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण केवळ गैरसमजातून कागल तालुक्यातील सुळकूड, कसबा सांगाव, रणदिवेवाडी तसेच शिरोळ तालुक्यातील दानवाड, दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडीमधील काही ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आज समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.
दूधगंगा धरणाची क्षमता २३.९९ टीएमसी आहे. १७.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी, ५.९५ टीएमसी पिण्यासाठी तर ०.४४ टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी आरक्षित आहे. बिगरसिंचनासाठी राखीव असणाऱ्या एकूण ६.३९ टीएमसी पाण्यामधून यापूर्वी मंजूर योजना, प्राप्त मागणी, भविष्याची योजना गृहीत धरुन धरणात १.४७ टीएमसी पाणी शिल्लक राहते. इचलकरंजीसाठी सध्या ०.९० टीएमसी तर ३० वर्षांनंतर १.०६ टीएमसी पाणी दरवर्षी लागेल. ते पाणी धरणात शिल्लक असून बिगरसिंचन आरक्षणातून इचलकरंजीला दिले जाणार असल्याने सिंचनाचा पाण्याच्या थेंबालाही धक्का लागणार नाही. तसे पत्रही जलसंपदा विभागाने दिल्यानंतरच योजना मंजूर झाल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
इचलकरंजीसाठी १ टीएमसी पाणी आजही दूधगंगा धरणात राखीव असून ते पंचगंगा नदीत सोडले जाते. पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने हेच आरक्षित पाणी पंचगंगेतून न घेता दूधगंगेच्या पात्रातून घेण्याच्या उद्देशानेच ही योजना केली आहे. या पाण्याचा साठा सुळकूड बंधाऱ्यात होत असल्याने धरणापर्यंत नदी बारमाही दुथडी भरुन राहणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. ही वस्तुस्थिती असून जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाने आंदोलनकर्त्यांचे गैरसमज दूर करुन योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
निवेदन देतेवेळी विठ्ठल चोपडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, अजितमामा जाधव, रवींद्र माने, पुंडलिक जाधव, रवी रजपुते, राजू बोंद्रे, भाऊसो आवळे, सदा मलाबादे, ध्रुवती दळवाई, संगीता आलासे, शुभांगी माळी, संगीता कदम, प्रताप पाटील, जावेद मोमीन, शामराव कुलकर्णी, अभिजीत पटवा, राजू कोन्नूर, उमेश पाटील उपस्थीत होते.