
बिनविरोधाची मात्रा, भुर्दंडातून सुटका
gad222.jpg ः
90689
बाजार समिती
---------------------------
बिनविरोधाची मात्रा, भुर्दंडातून सुटका
गडहिंग्लज बाजार समिती निवडणूक : दशकभरापासून तोट्यात; नेत्यांचा समजुतदारपणा हवा
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : तब्बल साडेतीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणारी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दशकभरापासून तोट्यात आहे. शेती मालाची आवक घटल्याने शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी समिती अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करावी अशीच सार्वत्रिक मागणी आहे. सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी समितीच्या अडचणीत समजूतदारपणा दाखवून निवडणूकीच्या भुर्दंडातून सुटका करावी अशी शेतकरी, व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.
सीमाभागातील मोठी म्हणून येथील बाजार समिती ओळखली जाते. गडहिंग्लज, आजरा, चंडगड आणि कागल तालुक्यातील ३७ गावे समितीचे कार्यक्षेत्र आहे. गुळ, मिरची आणि जनावरांचा बाजार ही या बाजार समितीची वैशिष्ट्ये आहेत. वैभवशाली पंरपरा असणाऱ्या या समितीला सुवर्णमहोत्सवापासून ग्रहण लागले. शेती उत्पादनांची घटलेली आवक समितीला अंदरबट्यात आणणारी ठरली. त्यातच काही कारभाऱ्यांनी समितीची आधार असणारी स्थावरच कवडीमोल दराने देऊन त्याचे अस्तित्वच धोक्यात आणले. निवडणुकीच्या निमित्ताने बाजार समितीला सुमारे वीस लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मुळातच कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महाग झालेल्या समितीला हा निवडणूकीचा खर्च कंबरडे मोडणारा ठरणार आहे.
बाजार समितीवर स्थापनेपासून कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. गत संचालक मंडळ बरखास्तीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रशासक मंडळ कार्यरत होते. आता या विभागातील सर्वच नेत्यांनी उर्वरित भाजपलाही सामावून घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले होते. परिणामी, जागांचा अट्टाहास न करता प्रत्येकानेच एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवल्यास समितीची निवडणूकीच्या भुर्दंडातून सुटका होऊ शकेल. यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी समजुतदारपणा दाखवत सहकाराच्या या संघर्षांच्या काळात बाजार समिती बिनविरोध करून आदर्श निर्माण करावा अशीच अपेक्षा आहे.
------------------------
* दोन वर्षापासून उपाशी
बाजार समितीचा कणा म्हणून ओळखले जाणारे कर्मचारी दोन वर्षापासून वेतनाविना उपाशी आहेत. यावरून आपल्याला समितीच्या कोसळलेल्या आर्थिक डोलाऱ्याची कल्पना येवू शकेल. वीसहून अधिक वर्षे नोकरी झाल्याने ‘सोडलं तर पळतय आणि धरलं तर चावतंय’ अशी विचित्र अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे.