गुढीपाडवा शोभायात्रा

गुढीपाडवा शोभायात्रा

90697

अवतरली अस्सल मराठमोळी संस्कृती
‘करवीर गर्जना’ची शोभायात्रा, रणरागिणींनी दिले विविध सामाजिक संदेशही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः डोईवर कोल्हापुरी फेटा, भरजरी शालू, भाळी ल्यायलेली चंद्रकोर आणि पायात कोल्हापुरी चप्पला, अशा अस्सल कोल्हापुरी थाटाला पारंपरिक वाद्यांचाही बाज लाभला आणि आज हजारो कोल्हापूरकरांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषात नववर्षाभिनंदन केले. निमित्त होते, येथील करवीर गर्जना ढोलताशा पथकाने आयोजित केलेल्या शोभायात्रेचे. दरम्यान, या शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालमित्रांचाही विविध वेशभूषेमध्ये लक्षणीय सहभाग राहिला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजकर तिकटी येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. ‘सांस्कृतिक लोककलांची अमृतधारा, जतन करू महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ, रंगाविष्कार, दुचाकी पथक, शिवकालीन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम, ध्वजपथक, विविध भजनी मंडळांचा शोभायात्रेत सहभाग होता. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी, सप्तशृंगी, माहूरची रेणुका माता यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमाही होत्या. महाराष्ट्रातील विविध लोककलाही सादर झाल्या. महिलांची बुलेट बाईक रॅली खास वैशिष्‍ट्य राहिले. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, गुजरी कॉर्नर, भवानी मंडप असा शोभायात्रेचा मार्ग राहिला. पथकाचे अध्यक्ष जितेंद्र कदम, ऋतुराज जोशी, युवराज जोशी, प्रतिक गोसावी, भक्ती परब आदींनी संयोजन केले.
..........
आम्ही चालवू हा पुढे वारसा
शोभायात्रेत पुरुषांबरोबरच महिलांचा पारंपरिक वेशभूषेत मोठा सहभाग राहिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, रणरागिणी ताराराणी यांच्यासह महापुरुषांच्या वेशभूषेत ही मंडळी सहभागी झाली. त्याशिवाय ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ अशी साद घालत बालचमूंचा सहभागही लक्षणीय होता. त्यांनी ‘वसुंधरा वाचवा’, ‘मराठी भाषा अधिक समृद्ध करूया, ‘पंचगंगा वाचवा’, ‘लेक लाडकी’ अशा आशयाच्या फलकांच्या माध्यमातून प्रबोधनही केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com