
चंद्रकांतदादा स्वागत
90721 ( दोन कॉलम)
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत
रेल्वेस्थानकांवर जल्लोष ः अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरीचे निमित्त
कोल्हापूर, ता. २२ ः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला निधीसह मंजुरी दिल्यानंतर आज कोल्हापुरात आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आज येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी हलगी घुमक्याचा कडकडाट आणि ‘एकच वादा, चंद्रकांत दादा’ च्या दिलेल्या घोषणांनी रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला.
अनेक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी होती. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पायाभूत सुविधाही उपलब्ध होत्या. पण, राज्यकर्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यात गेल्या शुक्रवारी श्री. पाटील यांनी विधानसभेत कोल्हापुरात यावर्षीपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी तब्बल २२१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली.
या घोषणेनंतर आज पहिल्यांदाच श्री. पाटील रेल्वेने कोल्हापुरात आले. रेल्वेस्थानकावर त्यांच्या प्रतीक्षेत सकाळपासूनच कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. पाटील यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहूल चिक्कोडे, सत्यजित उर्फ नाना कदम आदिंनी त्यांचे स्वागत केले. माजी नगरसेवक सुहास लटोरे, विजयसिंह खाडे-पाटील, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, राजू मोरे, भगवान काटे, माणिक पाटील-चुयेकर उपस्थित होते.
चौकट
‘थँक्स दादा’चे शहरभर फलक
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांप्रमाणेच कोल्हापुरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिलेल्या मंजुरीचे भाजपने पुरेपूर मार्केटींग केले. त्याचाच एक भाग म्हणून शहरभर ‘थँक्स दादा’ असा मजकूर लिहलेले डिजीटल फलक लावले होते. त्यावर ‘दादांनी आणलं’, ‘दादांनी आणलं’ असा लक्षवेधी मजकूर लिहला होता.