इचल: मनपा शाळा प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: मनपा शाळा प्रवेश
इचल: मनपा शाळा प्रवेश

इचल: मनपा शाळा प्रवेश

sakal_logo
By

महापालिकेच्या शाळांना पसंती

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर टागोर विद्यानिकेत, नायडू विद्या मंदिरात दोनशेवर पहिलीचे प्रवेश निश्चित

इचलकरंजी, ता.२२ ः खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या प्राथमिक शाळाही सर्वोत्तम असल्याचे यंदाही समोर येत आहे. यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरलेल्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेत व डॉ. सरोजिनी नायडू विद्या मंदिर क्रमांक ४३ मध्ये पालकांनी रांगा लावून पाल्याचा पहिलीतील प्रवेश निश्चित केला. या दोन्ही शाळांमध्ये प्रत्येकी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतला. मनपाच्या अन्य शाळांमध्येही आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून दरवर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त साधला जातो. त्यानुसार अलीकडे मनपापेक्षा खासगी शाळांमध्ये पाल्याला प्रवेश घेण्याचा पालकांचा ओढा वाढला आहे. मनपाच्या प्राथमिक शाळांचा घसरलेला दर्जा आणि वेळेत उपलब्ध होत नसलेली शैक्षणिक साधने तसेच अशैक्षणिक वातावरण याला काहीअंशी कारणीभूत होते. त्यामुळे पटसंख्या जोरात घसरत चालली होती. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून पुन्हा एकदा प्राथमिक शाळांच्या दर्जाबाबत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल शाळा संकल्पना सुरू केली आहे. आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
विविध शिष्यवृत्ती परीक्षांतही मनपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे मनपाच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. पुन्हा एकदा पालकांची पावले मनपा शाळेकडे वळत असल्याचे चित्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून दिसत आहे. त्यामुळे पटसंख्येत चांगली सुधारणा होत आहे. यंदाही मनपाच्या शाळांत पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी झुंबड उडाली होती. काही ठिकाणी रांगेत राहून पालकांनी पाल्यांचा प्रवेश निश्चित केला. शिक्षकांनीही प्रवेशाची जय्यत तयारी केल्याचे चित्र दिसून आले. मंडप, रांगोळी, सजावट यामुळे प्रवेशोत्सवाचे आज जोरदार वातावरण निर्माण झाले होते.
.................
सरोजिनी नायडू शाळेचे शतक
डॉ. सरोजिनी नायडू शाळा क्रमांक ४३ ही पहिली मनपाची आयएसओ मानांकन प्राथमिक शाळा आहे. भौतिक सुविधा व गुणवत्तावाढीमुळे शाळेची पटसंख्या २०० वरून ४४०पर्यंत पोहोचली आहे. आज तब्बल १०० विद्यार्थ्यांचा पहिलीतील प्रवेश निश्चित झाला. पुढील काही दिवसांत विक्रमी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
..........
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनची भरारी
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्रमांक २७ कडे आदर्श शाळा म्हणून पाहिले जाते. येथे प्रवेशासाठी पालकांकडून अक्षरशः वशिला लावला जातो. गेल्या १७ वर्षांतील पटसंख्येचा आलेख ८० वरून १२८० पर्यंत पोहोचला आहे. आज पहिलीच्या वर्गात तब्बल १३२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंद झाली, तर दुसरी ते आठवीच्या वर्गात ३५ नवे विद्यार्थी आज दाखल झाले.
.......................