
प्रकल्पग्रस्त आंदोलन
फोटो
...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
उभारली प्रकल्पग्रस्तांनी गुढी
सरकारचे वेधले लक्ष ः आंदोलनाचा २४ वा दिवस
कोल्हापूर, ता. २२ : मागील २४ दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा जिल्हा प्रशासन आणि सरकारने सकारात्मक विचार केलेला नाही. त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांनी गुढीपाडव्याचा सण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुढी उभारुन त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ फेब्रुवारीपासून चांदोली अभयारण्यग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी २४ दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी आज शोषणमुक्तीच्या स्वप्नांची गुढी उभारून जाती मुक्तीची फॅसिझमविरोधी गुढी उभी करण्यात आली. गुढी उभी करत असताना या आंदोलनातील स्त्री-पुरुषांनी घोषणा व चळवळीचे गीत गायले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक प्रश्नावर संकलन दुरुस्ती, भूखंडाचे आदेश काढणे, उपलब्ध झालेल्या निधीचे वाटप करण्याचे काम झालेले नाही. याबद्दल प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी व शुक्रवारी प्रधान सचिव व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बैठकीचे पत्र व स्थानिक प्रश्नांची प्रत्यक्षात सोडवणूक न झाल्यास श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभा केला जाणार आहे. आंदोलनस्थळी मारुती पाटील, डी.के. बोडके, नजीर चौगुले, आनंदा आमकर, पांडुरंग पवार, पांडुरंग कोठारी, दाऊद पटेल जगन्नाथ कुडतुडकर, विनोद बडदे, मारुती धोंडीबा पाटील, शामराव उंडे यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.