
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदान तयारी
लोगो ः महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा
चार जिल्ह्याच्या
संघाचे आगमन
सांगली, ता. २२ ः जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरु होते. बुधवारी चार जिल्ह्यांचे संघ प्रशिक्षकांसह स्पर्धास्थळी दाखल झाले. व्यासपीठ उभारणी, गॅलरी तसेच अन्य व्यवस्था उभारणीसाठी संयोजकांची धावपळ सुरु होती.
येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची लगबग सुरु आहे. समस्यांच्या गर्तेत असणारे जिल्हा क्रीडा संकुल दोन वर्षांपासून दुर्लक्षित होते. या स्पर्धेमुळे संकुलात वर्दळ वाढली आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील बॅडमिंटन कोर्टवर स्पर्धेसाठी मंडप उभारणी होत आहे. दिवसभरात व्यासपीठ उभारणी तसेच सभोवताली मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले. नागपूर, हिंगोली तसेच ठाण्याच्या महिला संघांचे सायंकाळी संकुलात आगमन झाले. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, ‘‘उद्या (ता. २३) रोजी सकाळी आठपासून महिला खेळाडूंची वजने घेण्यात येतील. वजन गटानुसार गट पाडले जातील. दुपारी एकपर्यंत स्क्रिनिंग पूर्ण होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता स्पर्धेचे उद्धाटन होईल. रात्रीपर्यंत सामने रंगतील. शुक्रवारी सकाळी सातपासून दिवसभर सामने होणार आहेत. वजनी गटातील सामन्यांचे निकाल झाल्यानंतर स्पर्धेसाठी सायंकाळी महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होईल.’’