
शासनाने आमच्या अनुदानाची गुढी उभारावी
शासनाने आमच्या अनुदानाची गुढी उभारावी
विनाअनुदानित शिक्षकांची मागणी; दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः शासनाने आमच्यासाठी विनाअट अनुदान देण्याची गुढी उभारावी, अशी मागणी विनाअनुदानित शिक्षकांनी आज केली. त्यांनी सलग दुसऱ्यादिवशी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले.
शासनाने एकीकडे अनुदान देऊन महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर वाटले होते की, २० टक्के, ४० टक्के आणि ६० टक्के अनुदान मिळल्यावर थोडी फार संसाराला मदत होईल. पण, मार्च संपत आला, तरी आलेले अनुदान वितरित करण्यासाठी अजून देखील शासनाकडून हालचाल होत नाही. त्याच्या निषेधार्थ आज गुढीपाडवाच्या दिनी अंशतः अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काचे अनुदान मिळावे, यासाठी धरणे आंदोलन केले. शासनाने त्याची दखल घेतली नाही. मात्र, तरीही आम्ही खचणार नाही. मोडणार नाही,आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्धार राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केला. यावेळी भानुदास गाडे, रामराजे सुतार, केदारी मगदूम, सावंता माळी, ओंकार संकपाळ, पी. आर. पाटील, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
..................
तर, उग्र आंदोलन करणार
‘जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू राहील. तरीही दखल न घेतल्यास उद्या, गुरूवारपासून उग्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा जगदाळे यांनी दिला.