पहिलीच्या वर्गात हळदीची ‘पाऊल वाट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिलीच्या वर्गात हळदीची ‘पाऊल वाट’
पहिलीच्या वर्गात हळदीची ‘पाऊल वाट’

पहिलीच्या वर्गात हळदीची ‘पाऊल वाट’

sakal_logo
By

GAD232.JPG
90845
हनिमनाळ : जिल्हा परिषदेच्या शाळेत गुढीपाडव्यानिमित्त प्रवेशोत्सव झाला. प्रवेशित चिमुकल्यांच्या स्वागतप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
पहिलीच्या वर्गात हळदीची ‘पाऊल वाट’
हनिमनाळ शाळेत प्रवेशोत्सव : चिमुकल्यांच्या पायाचे हळदीत उमटवले ठसे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : तालुक्यातील हनिमनाळ प्राथमिक शाळेत गुढीपाडव्यानिमित्त प्रवेशोत्सव झाला. यावेळी चिमुकल्यांच्या पायाचे हळदीमध्ये ठसे घेवून त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेशित केले. मुख्याध्यापक गंगाप्पा डंगी यांच्या पुढाकाराने शिक्षकांनी हा आगळा-वेगळा उपक्रम राबवला.
अंगणवाडीतील चिमुकल्यांचं पहिलं पाऊल आज पहिलीच्या वर्गात पडले. मुलगी लग्न होऊन सासरच्या घरी प्रवेश करताना धान्याचे माप ओलांडते. कारण, तिच्या आयुष्याची ती नवी सुरवात असते. त्याच पद्धतीने पहिलीच्या वर्गात दाखल होणार्‍या मुलांचा प्रवेश म्हणजे भविष्यातील अधिकारी...सुजाण नागरिक... आणि माणूस होण्याच्या प्रक्रियेतील महत्वाची घटना. म्हणूनच त्यांचा हा प्रवशोत्सव तेवढाच संस्मरणीय ठरावा यासाठी सर्व मुलांचे हळदीच्या पायाचे ठसे घेवून पहिलीत प्रवेश देण्यात आला. ज्यावेळी ही चिमुकली सातवी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतील, तेंव्हा त्यांच्या पालकांना त्यांची ही गोड आठवण शाळेतर्फे भेट दिली जाणार आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत अंगणवाडीतील १९ पैकी १५ मुलांना प्रवेश देण्यात आला. मुख्याध्यापक डंगी यांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मराठी शाळांचे महत्व व शाळेची घोडदौड याची माहिती पालकांना दिली. सर्व १५ मुलांचे मुख्याध्यापक डंगी व निर्मला चिनगोंडा यांच्याहस्ते शैक्षणिक साहित्य, गुलाब पुष्प व फुगा देऊन स्वागत केले. शिक्षक तुकाराम जाधव यांनी आभार मानले.
-------------
* दादा-ताईंची गुढी
पहिलीच्या वर्गात चिमुकल्यांच्या या स्वागतासाठी सातवीतील त्यांच्या दादा-ताईंनी गुढी उभारण्याचे नियोजन केले होते. पहिलीच्या पालकांच्या हस्तेच या खास गुढीची उभारणी करुन त्याचे पूजन करण्यात आले. प्रवेशोत्सवासाठी शिक्षकांच्या परिश्रमातून सुंदर सेल्फी पाँईटही तयार केला होता. त्याचठिकाणी सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले.