क्षयपूरक आहार निधी पडतोय अपुरा

क्षयपूरक आहार निधी पडतोय अपुरा

लोगो ः जागतिक क्षयरोग दिन विशेष
----------------------
क्षयपूरक आहार निधी पडतोय अपुरा

दानशूर व्यक्ती, संस्थांकडे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ; निधी वाढवण्याची गरज

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ : २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राज्यातील अनेक केंद्रांमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून क्षयरोगाबाबत प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. शासनही अनेक पातळ्यांवर उपक्रम राबवत आहे. यासाठी लाखो रुपये खर्च होत असताना क्षयरोगासोबत लढण्यासाठी अत्यावश्यक असणारा पूरक आहार निधी मात्र अपुरा पडताना दिसत आहे. सध्या शासनाकडून संक्रमित रुग्णांना महिन्याकाठी ५०० रुपये असा सहा महिने निधी दिला जातो. मात्र, महागाईत तो अत्यल्प ठरत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडे मदतीसाठी हात पसरावे लागत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने २०३५ पर्यंत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे पूर्णत: निर्मूलन करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा, तालुकासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रबोधन केले जात आहे. तसेच क्षयरुग्णांना पूरक आहार महत्त्वाचा आल्याने २०१९ पासून पूरक आहाराचा निधी खात्यावर जमा केला जात आहे. तो सहा महिन्यांसाठी असून, एकूण तीन हजार रुपये दिले जातात. क्षयरुग्णास दिवसातून पाच ते सहावेळा हलका आहार घेणे, मांसाहारी व्यक्तीने आठवड्यापासून तीनवेळा अंडी, मटण, मासे तर शाकाहारी व्यक्तीने दूध, डाळी, कडधान्ये घेणे आवश्यक आहे. यासोबत ऋतुप्रमाणे फळे, पालेभाज्यांचा समावेश आहारात असणे आवश्यक आहे. मात्र, एका व्यक्तीमागे महिन्यासाठी पूरक आहाराचा खर्च सुमारे एक हजार रुपये येतो. परिणामी शासनाकडून मिळणारा पूरक आहार निधी अपुरा पडत आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील सुमारे १७ गावांमध्ये २५० रुग्ण क्षयरोगावर उपचार घेत आहेत. यातील ७० टक्के रुग्ण केवळ इचलकरंजी शहरातील आहेत. पूर्वी क्षयरोग म्हणजे मृत्यू, असे समजले जात होते. सध्याही या रोगाबाबत नागरिकांमध्ये महितीचा अभाव दिसून येतो. क्षयरोगाचे पूर्ण उच्चाटन व्हावे, हा उद्देश ठेवून पूरक आहाराचा निधी देण्यात येतो. मात्र, तो अपुरा पडत आहे.
...............
‘सकाळ’मुळे थकीत निधी रुग्णांच्या खात्यावर जमा
शासनाकडून दिला जाणारा जिल्ह्याचा क्षयपूरक आहाराचा निधी जानेवारी २०२१ पासून थकीत होता. सुमारे दीड वर्ष रुग्ण या निधीपासून वंचित होते. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवल्यानंतर थकीत निधी रुग्णांच्या खात्यावर जमा केला होता.
................
इचलकरंजी शहरात कामगार वस्ती अधिक आहे. त्यासोबत स्थलांतरित नागरिकांची संख्याही जास्त असते. कारखाने, सायझिंग, प्रोसेस यामुळे शहरात वायुप्रदूषणही अधिक आहे. परिणामी क्षयरोगास पोषक वातावरण असल्याने येथे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या रोगातून मुक्त होण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बाजवतो. त्यामुळे क्षयासोबत लढताना पूरक आहार महत्त्वाचा आहे.
-मानसी कदम, क्षयरोग विभागप्रमुख, आयजीएम
.......................
२०२२ मधील आयजीएममधील क्षयरोगबाधित संख्या
पुरुष १९०
स्त्री १७६
मुले १०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com