
हौस... नको गं बाई
दागिन्यांची हौस... नको गं बाई !
किमती दागिने वापरणे असुरक्षित; गडहिंग्लजला वाढत्या घटनांमुळे महिला त्रस्त
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. आता ते बोलण्यापुरतेच सोपे राहिले आहे. कारण, आता गळ्यात दागिने घालून हौस करण्यालाही आता भारी किमत मोजावी लागत आहे. सोन्याच्या दागिन्यांवर जाता-जाता सहजच डल्ला मारला जात असल्याने गडहिंग्लजमधील महिलांवर आता ''हौस नको गं बाई...'' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. महिलांमधील ही भिती नाहीशी करण्यासाठी पोलिस यंत्रणा आता अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे.
सध्या वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक दागिने महिलांवर भुरळ घालत आहेत. हौसेसाठी त्याची खरेदीही केली जाते. दरम्यान, अलीकडील काही वर्षापर्यंत बिनधास्तपणे दागिने घालून वावरणे सोपे होते. मात्र आताची परिस्थिती सुरक्षित नाही. पावला-पावलांवर सोन्याच्या या दागिन्यांवर कोणाची तरी नजर आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पॉलीश करुन देतो असे सांगून दागिने लांबवणे, धूम स्टाईलने मोटरसायकलवरुन आलेल्या तरुणांकडून दागिने हिसकावून नेणे, पोलिस असल्याची बतावणी करुन अंगावरील दागिने काढून घेवून पोबारा करणे अशा प्रकारातून जाता-जाता महिलांना फसवले जात आहे.
सोन्याची जितकी हौस महिलांना असते, तितकीच या दागिन्यांची काळजीही त्यांना असते. या काळजीपोटीच त्या समोरच्याच्या मधाळ बोलण्याला भाळून दागिने सहज काढून देतात. कोणत्याही कोपऱ्यातील पोलिस कर्मचारी अंगावरील दागिने मागत नाहीत, हा साधा सरळ व्यवहार त्यांना लक्षात येत नाही. यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. वारंवार वृत्तपत्रांसह सोशल मिडीयातून प्रबोधन होत असले तरी अशा घटना मात्र थांबलेल्या नाहीत.
चार दिवसात गडहिंग्लजमध्ये अशा दोन घटना घडल्या. एकाला पोलिस असल्याची बतावणी करुन दोघा अज्ञातांनी लुबाडले तर एका महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावून नेले. या दोन्ही घटना भरदिवसा घडल्या. अलीकडे अशा घटना सर्रास घडत आहेत. यापूर्वीसुद्धा सहा ते सात घटना घडल्या असून एकही संशयित सापडलेला नाही. कोणीही यावे आणि महिलांना फसवून जावे अशी स्थिती गडहिंग्लजची झाली आहे. मध्यंतरी पोलिसांनी महिलांचे प्रबोधन केले. मात्र वारंवार घडणाऱ्या घटना पाहता प्रबोधनाचा प्रभाव पडला नसल्याचे चित्र आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहीलेला नाही अशी स्थिती आहे. आता पेट्रोलिंग वाढवण्यासह साध्या वेशातील पोलिस कर्मचार्यांना निर्जन भागात वारंवार फेर्या मारण्याची गरज आहे.
-------------------
* हे लक्षात घ्या...
- पोलिस कधीच अंगावरील दागिने मागत नाहीत
- किमती दागिने घालून निर्जन भागातून एकटी पायी जावू नका
- कोणत्याही अनोळखीचा संशय येताच पोलिसांना कळवा
- प्रवासाला जाताना दागिने वापरणे टाळा
- अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन नको
- फसवणूक घटनांतून सजग व्हा...सुरक्षित रहा