इचल : टुडेसाठी महापालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : टुडेसाठी महापालिका
इचल : टुडेसाठी महापालिका

इचल : टुडेसाठी महापालिका

sakal_logo
By

ich248.jpg
91213
इचलकरंजी ः थोरात चौकाचे नव्याने केलेले सुशोभिकरण. (संग्रहीत)
-------------------
शहर सौंदर्यीकरणात लागणार कस
इचलकरंजी महापालिका; मुल्यांकन सुरू झाल्याने उत्सुकता
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ ः राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शहर सौंदर्यीकरण स्पर्धा आयोजीत केली आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेचाही सहभाग आहे. त्यानुसार प्रशासनाकडून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे विविध उपक्रम वर्षभर हाती घेतले होते. त्याचे शासन पातळीवरुन मुल्यमापन सुरु झाले आहे. इचलकरंजी महापालिकेला आता राज्यातील अन्य ‘ड’ वर्गातील महापालिकांशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत इचलकरंजी मनपाच्या कामाची छाप उमटणार काय, याची उत्सुकता आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणच्या धर्तीवर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शहर सौंदर्यीकरण अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चार महत्वाच्या बाबींवर फोकस केला आहे. जलाशय, हरीतपट्टे, पर्यटन व बाजार या चार बाबींवर संबंधित ठिकाणांचे सुशोभिकरण करण्यावर भर दिला आहे. नगरपंचायतीसह सर्व वर्गातील नगपरिषद आणि महापालिकांसाठी ही स्पर्धा आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गात येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांना गुणानुक्रमे पंधरा, दहा व पाच कोटी रुपये बक्षिसाची रक्कम ठेवली आहे. यासंदर्भात केलेल्या कामकाजाची छाननी करण्यासाठी विभागीय स्तरावर समिती स्थापन केली आहे. त्याचे विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत. राज्यस्तरीय मुल्यांकन समिती ही अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. याबाबतच्या कार्यवाहीला शासन पातळीवरुन गती आली आहे.
स्पर्धेत इचलकरंजी महापालिकेनेही सहभाग नोंदवला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार चार बाबींवर तत्कालीन पालिका आणि आता महापालिका प्रशासनाकडून वर्षभर आवश्यक कार्यावाही सुरु होती. यामध्ये काही ठळक बाबींचा उल्लेखा करता येईल. विशेषतः पंचगंगा नदीघाट परिसरात रंगरंगोटी करुन सुशोभिकरण केले आहे. भगतसिंग उद्यानातील तलावावर कारंजे बसवले आहेत. शहापूर खाण परिसरात काही अंशी सुधारणा केल्या आहेत. शहराच्या विविध बागात हरीतपट्टे तयार केले आहेत. शिवतिर्थ परिसराचे पहिल्या टप्प्यातील सुशोभिकरण झाले आहे. या शिवाय रस्ता दुभाजकांची रंगरंगोटी करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील काळातही शहराच्या सौंदर्यात भर पडणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने शहराच्या सौंदर्यात काही अंशी तरी भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
--------
विभागीय आयुक्तांकडे सादरीकरण
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसाठी विभागीय आयुक्तांकडे महापालिका प्रशासनाकडून सादरीकरण केले आहे. यामध्ये शहर सौंदर्यीकरणासाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेचा नजिकच्या काळात निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या कामगारीवर लक्ष असणार आहे.