
राजेश चषक फुटबॉल
91014
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार विरुद्ध सम्राट नगर स्पोर्ट्स यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
‘जुना बुधवार’चा सम्राटनगरवर विजय
राजेश चषक फुटबॉल स्पर्धा; पाच विरुद्ध एक गोल फरकाने मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. २३ : संयुक्त जुना बुधवार तालीम संघाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर पाच विरुद्ध एक गोलनी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेचे सामने खेळवले जात आहेत.
जुना बुधवारने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचा पवित्रा घेतला. दहाव्या मिनिटाला जुना बुधवारच्या प्रसाद संकपाळ याने मैदानी गोल करून संघाला एक गोलची आघाडी मिळवून दिली. सम्राटनगरच्या खेळाडूमधील समन्वय कमकुवत झाल्याचा फायदा घेत जुना बुधवारच्या सचिन मोरे याच्या पासवर रविराज भोसले यांने दुसऱ्या गोलची नोंद केली. पहिल्या दहा-पंधरा मिनिटात दोन गोल झाल्यानंतर सम्राटनगरच्या खेळाडूंनी आक्रमक चढाई केल्या. ३२ व्या मिनिटाला सम्राट नगरच्या कपिल जाधव याने जुना बुधवारच्या डी मध्ये उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत डी बाहेरून जोरदार फटका मारला, आणि शानदार गोल केला. उत्तरार्धापर्यंत सामना तीन-एक असा गोल फरकात होता.
उत्तरार्धात तीन गोलचे ओझे घेऊन मैदानावर उतरलेल्या सम्राटाच्या खेळाडूंनी गोलच्या परतफेडीसाठी जोरदार मुसंडी मारली. पण या चालीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश आलं नाही. दरम्यान अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला जुना बुधवारच्या पृथ्वीराज कदम याने चेंडूचा ताबा घेत थेट मैदानी गोल करून सम्राट नगरला पुन्हा हादरा दिला. त्यानंतर काही मिनिटातच म्हणजे ५५ व्या मिनिटाला अभिषेक भोपळे यानेही मिळालेल्या संधीचा लाभ घेत पाचव्या गोलची नोंद केली. यानंतर सामन्यावर जुना बुधवारचेच वर्चस्व राहिले. सम्राटकडून अभिराज काटकर, निलेश खापरे, संदीप आडनाईक, आकाश काटे यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. हा सामना अखेरीला ५:१ अशा गोलफरकाने संयुक्त जुना बुधवार संघाने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.
------------------
सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू - आकाश मोरे, संयुक्त जुना बुधवार
लढवय्या खेळाडू- कार्तिक जाधव, सम्राट नगर
--------------
आजचा सामना
पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल संघ : दुपारी चार वाजता