विधी मंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधी मंडळ
विधी मंडळ

विधी मंडळ

sakal_logo
By

औषधखरेदीवरुन मंत्रिमंडळात वाद ?
मुंबई, ता.२२ ः सार्वजनिक रुग्णालयातील औषधखरेदीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हाफकिन महामंडळाचे सर्वाधिकार अन्न व औषध पुरवठा विभागाला दिले असतानाही अद्याप प्रक्रिया सुरु न झाल्याने आज मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली, अशी चर्चा आहे. अन्न व औषध विभागाने जुनी देयके दिली नाहीत तसेच नव्या खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरु केली नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग चिंतीत झाला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे आज बोलले जात होते.या कोंडीतून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्याचे समजते.
००००००००००००००
मराठी भाषेला लक्तरे नेसवून
चौपाटीवर उभी करु नका
उध्दव ठाकरेंची शिंदे सरकारला आर्त हाक
मृणालिनी नानिवडेकर / सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.२३ ः मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीसारखेच गिरगाव चौपाटीसमोर उभारले जाणारे मराठी भाषा भवन हे मुंबईची ओळख ठरणारे असावे, या आग्रहावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अत्यंत ठाम असून त्यांच्या या भूमिकेला शिंदे फडणवीस सरकार सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत आहे. मंत्रालयासमोर मराठी भाषा लक्तरे नेसून भीक मागत असल्याची खंत कवी कुसुमाग्रजांनी व्यक्त केली होती.
आता आपापसातले पराकोटीचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी सर्व संबंधित एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारापोरवाला मत्स्यालयासमोर मराठी भाषा भवन उभे करण्याचा प्रस्ताव महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. हे भाषा भवन एकमेवाव्दितीय व्हावे यासाठी तत्कालिन मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांनी रेखांकने मागवली होती. या रेखांकनात आता काही फेरफार होत असल्याची कुणकुण सुरु असल्याने आज या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बोलावलेल्या या बैठकीला उध्दव ठाकरे यांनी या भाषा भवनात समोर समुद्र दिसतोय म्हणून भेळपुरीची दुकाने थाटण्यास जागा देवू नका, असे सुनावल्याची दिवसभर चर्चा होती.
मुंबईतील नामांकित वास्तुशिल्पी पी. के. दास यांनी सादर केलेले भाषा भवनासाठीचे रेखांकन सरकारने स्वीकारले आहे. त्यास अंतिम रुप देताना सरकारच्या काही विभागांची कार्यालये दक्षिण मुंबईतील जागेची चणचण लक्षात घेता तेथे हलवावीत, अशा प्रस्तावावर काही हालचाली सुरु असल्याचेही बोलण्यात येत होते. आज यासंबंधात झालेल्या बैठकीत मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांना ठाकरे आणि देसाई यांनी काही प्रश्न केले असे सांगितले जात होते. या भवनात सुसज्ज ग्रंथालय, प्रेक्षागृह, अभ्यासकक्ष, दृकश्राव्य माध्यमांसाठी विशेष सभागृह आणि जागतिक स्तरावर भाषासंवर्धनासाठी होत असणाऱ्या उपक्रमांसारखे सर्व तंत्रज्ञान हजर असेल, असे केसरकर यांनी मान्य केले. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उद्धव ठाकरेंसह सर्व संबंधितांची पुन्हा बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव केसरकर यांनी ठेवला आहे.

०००००००००

अजित पवारांच्या बैठकीचा
स्टॅमिना पाहून विरोधकही हवालदिल
मंबई, ता. २३ : विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहेतच , मात्र गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पवार यांच्या पूर्णवेळ उपस्थितीने विरोधकांनीही पवार यांच्या स्टॅमिनाचे कौतुक केले आहे. सकाळी दहा ते रात्री सदनाचे काम संपेपर्यंत सभागृहात बसणार एकमेव नेते बसणारे पवार होय. यामुळेच अधिकारी, पत्रकार आणि सर्वच राजकीय नेत्यांमध्ये पवार यांच्या सदनात पूर्णवेळ बसण्याच्या स्टॅमिनाची चर्चा होत आहे .

सर्वच राजकीय पक्षातील आमदार ,मंत्री काही अपवाद सोडता सभागृहात पूर्णवेळ बसत नाहीत .आपली लक्षवेधी ,प्रस्ताव,उत्तर झाल्यास ते बाहेर निघून जातात .मात्र पवार सकाळी दहा वाजता सदनात येऊन ठाण मांडतात ते रात्री अकरा ,बारा वाजल्या तरी आपल्या जागेवरून हलत नाहीत .कित्येक वेळा सभागृहात 288 आमदारांपैकी आठ ते दहा आमदार हजर असतात. मात्र प्रत्येक विधानसभेतील सदस्याचे लक्षपूर्वक एकूण त्याला पवार मनापासून प्रतिसाद देतात .

मात्र हा स्टॅमिना येतो कुठून असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे .आज २९३ च्या प्रस्तावावर पवार यांचे नऊ वाजताच सभागृहात बोलून झाले होते ,मात्र ते रात्री अकरा वाजेपर्यंत सदनातून हलले नाहीत . इतकी बैठक असणारा नेता या पंचवीस ते तीस वर्षात आम्ही पाहिला नाही असे मनोगत ज्या आमदारांनी तीन ते चार टर्म निवडून आले आहेत त्यांनी व्यक्त केले . सभागृहात पूर्णवेळ बसण्यास सर्वच राजकीय पक्षाचे तरुण ,ज्येष्ठ नेते टाळाटाळ करत असताना पवार ज्या कार्यक्षमतेने बसतात ते नवीन येणाऱ्या सभागृहातील सदस्यांसाठी एक प्रेरणाच आहे .असे सभागृहातील तरुण आमदारांनी मत व्यक्त केले .