
भारती विद्यापीठ कॉलेजने पटकविला ‘फार्मा करंडक’
भारती विद्यापीठ कॉलेजने
पटकविला ‘फार्मा करंडक’
आनंदी फार्मसी कॉलेज उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत फार्मा करंडक सांस्कृतिक स्पर्धा मंगळवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात घेण्यात आली. त्यात भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने सांघिक विजेतेपदावर नाव कोरले. कळे येथील आनंदी फार्मसी कॉलेज उपविजेते ठरले.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धेमध्ये सहभागी होवून व्यक्तिमत्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी फार्मसी अग्रणी महाविद्यालय समितीचे अध्यक्ष डॉ. एच. एन. मोरे, समन्वयक डॉ. एस. जी. किल्लेदार, सचिव प्रा. आर. पी. ढवळे उपस्थित होते. बॅले, नृत्य, नाटक, लघुनाटिका, मूकनाट्य, गायन, वाद्यवादन, चित्रकला, रांगोळी, फ्लॉवर ॲरेजमेंट, कोलाज, पोस्टर पेटिंग, लेखन, या प्रकारांमध्ये स्पर्धा झाली. त्यात १४ महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले. अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, या स्पर्धेत जतिन सासने (उत्कृष्ट अभिनेता), अपूर्वा साळुंखे (अभिनेत्री), स्नेहल दरेकर (नृत्य सोलो), आनंदी फार्मसी कॉलेज (नृत्य, सांघिक), श्रेया रणभिसे (उत्कृष्ट गायिका), श्रृतिका पाटील (लेखक), साक्षी शर्मा (कलाकार), यश कदम (वादक), साक्षी भंडारी (चतुरस्त्र कलाकार), योगेश पुजारी (विशेष नैपुण्य) यांनी वैयक्तिक बक्षीसे पटकविली.