‘पट वाढवा’ नाही, पट घटला!

‘पट वाढवा’ नाही, पट घटला!

‘पट वाढवा’ नाही, पट घटला!
यंदा शिक्षक पडले कमी; शिल्लक ८०२ विद्यार्थ्यांसाठी व्हावेत प्रयत्न
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : मूळात पटनोंदणी सर्वेक्षणात सहा वर्षांवरील बालकांत गतवर्षीपेक्षा २६३ ने घट आली होती. अशा वेळी जिल्हा परिषदेच्या शाळांत दाखल विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम होणे अपेक्षित होते. पण, विद्यार्थी दाखल करुन घेण्यातही शिक्षक गतवर्षीच्या तुलनेत कमी पडल्याचे आकडेवारी दाखवत आहे. यंदा गुढी पाडव्यादिवशी ९८९ विद्यार्थी दाखल झाले आहेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अजून अवधी आहे. या कालावधीत तालुक्यातील शिल्लक ८०२ विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न व्हायला हवेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर एकीकडे घटता जननदर, नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्या-मुंबईला स्थलांतरीत होणारी कुटुंबे ही आव्हाने आहेत. तर दुसरीकडे खासगी इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळांचेही आव्हान आहे. जननदर, कुटुंबांचे स्थलांतर या गोष्टी शिक्षकांच्या हातातील नक्कीच नाहीत. पण, खासगी शाळांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखणे निश्चितच त्यांच्या हातात आहे. त्यासाठीच शिक्षण विभागातर्फे गुढी पाडवा, पट वाढवा अभियान राबवले जाते. गुढी पाडव्यादिवशी जिल्हा परिषदेच्या शाळांत अधिकाधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित व्हावा, हा यामागील उद्देश आहे.
मात्र, गतवर्षीचा विचार केला तर यंदा विद्यार्थी दाखल करुन घेण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक थोडे कमी पडल्याचे दिसून येत आहे. मूळात दाखलपात्र विद्यार्थ्यांत गतवर्षीपेक्षा घट आहे. त्यामुळे अधिक प्रभावीपणे कामाची अपेक्षा होती. पण, ती फोल ठरल्याचे दिसून येते. गतवर्षीपेक्षा यंदा २४६ विद्यार्थी कमी दाखल झाले आहेत. सर्वेक्षणातही दाखलपात्र विद्यार्थ्यांत घट होती, ही सबब गैरलागू पडू शकते. कारण, गतवर्षी दाखलपात्रच्या तुलनेत दाखल विद्यार्थ्यांची टक्केवारी ६०.१३ इतकी होती. ती यंदा ५५.२२ पर्यंत घसरली आहे. ज्या गोष्टी हातात नाहीत त्याची कारणे पुढे करण्याऐवजी अडचणीच्या काळात हातातील गोष्टींवर काम करणे महत्वाचे आहे.
आता सारेच संपले असे म्हणण्याचेही कारण नाही. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अद्याप अडीच महिन्यांचा कालावधी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुढी पाडव्याला प्रवेश न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८०२ इतकी आहे. त्यांच्यासाठी रस्सीखेच होणे स्वाभाविक आहे. यातील अधिकाधिक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत कसे येतील यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
--------------------
* महागाव, बेळगुंदी मागे...
सर्वेक्षणातील दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी प्रत्यक्ष दाखल करुन घेण्यात महागाव आणि त्यापाठोपाठ बेळगुंदी केंद्र मागे असल्याचे दिसून येत आहे. महागाव केंद्रात अवघे ३२.३९ टक्केच तर बेळगुंदी केंद्रात ३६.१७ टक्के विद्यार्थी दाखल झाले आहेत. नूल केंद्रात सर्वाधिक ७८.५३ टक्के विद्यार्थी दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ हिडदुग्गी केंद्राची टक्केवारी ७५.३० इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com