इचल : घरफाळा वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : घरफाळा वसुली
इचल : घरफाळा वसुली

इचल : घरफाळा वसुली

sakal_logo
By

दंडापोटी पावणेचार कोटी जमा
इचलकरंजी महापालिका; घरफाळ्याची आजअखेर ७३ टक्के वसुली

इचलकरंजी, ता. २४ ः अनेक मिळकतधारकांनी मुदतीत घरफाळा भरला नाही. त्याचा मोठा आर्थिक लाभ महापालिकेला झाल्याचे समोर आले आहे. निव्वळ दंडापोटी आजअखेर तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मार्चअखेर आणखी एक कोटी केवळ दंडापोटी मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा घरफाळा वसुली चांगली झाली. त्यामुळे वसुलीसाठी अपवाद वगळता महापालिका प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागलेली नाहीत.
घरफाळा भरण्याची अंतिम मुदत दरवर्षी ३१ डिसेंबर असते. त्यानुसार अनेक मिळकतधारक मुदतीत घरफाळा भरतात. यासाठी असलेल्या सवलतीचा लाभही अनेक मिळकतधारक घेत असतात. पण ३१ मार्चपर्यंत वाट बघण्याची मानसिकता अनेक मिळकतधारकांची झाली आहे. किंबहुना महापालिका प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम सुरू केल्यानंतर घरफाळा व पाणीपट्टी भरण्याबाबत संबंधित नागरिकांची तारांबळ उडालेली दिसते. यंदाही महापालिकेने मुदतीत घरफाळा न भरलेल्या मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. संयुक्त करावर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. मार्चमध्ये घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना संयुक्त करावर ६ टक्के दंड भरावा लागतो. ही दंडाची जमा झालेली रक्कम कोटीच्या घरात आहे. दरमहा २ टक्के दंडात्मक आकारणीतून आजअखेर ३ कोटी ७३ लाख ३८ हजार ८१२ इतका महसूल महापालिकेला मिळाला. मार्चअखेर किमान एक कोटी रुपये जमा होतील, असे कर अधिकारी आरिफा नुलकर यांनी सांगितले.
--------------
कठोर कारवाई नाहीच....
घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी दरवर्षी महापालिकेकडून जानेवारीनंतर कठोर कारवाई केली जाते. तुलनेने यंदा मात्र फारशी कठोर कारवाई करण्याची वेळ प्रशासनावर नाही. केवळ १५ मिळकती सील करण्यात आल्या. तर २५ नळकनेक्शन तोडले आहेत.
------------
धनादेश न वटल्यास...
संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मिळकतधारक धनादेश देतात. पण अनेक धनादेश न वटताच परत येत आहेत. त्यावर पर्याय म्हणून रोकड भरणा करुन घेणे अथवा संबंधित मिळकत सील करणे, याबाबत तत्काळ कारवाई होत आहे.
-----------
करवसुली दृष्टिक्षेप (२३ मार्चअखेर)
घरफाळा - ३९ कोटी २४ लाख (७३.९२ टक्के)
पाणीपट्टी - ६ कोटी ८१ लाख (४८.०१ टक्के)
एकूण - ४६ कोटी ५ लाख (६८.४५ टक्के)