महाविकास आघाडीचे भाजपपुढे आव्हान नव्हेच

महाविकास आघाडीचे भाजपपुढे आव्हान नव्हेच

महाविकास आघाडीचे भाजपपुढे आव्हान नाहीच
चंद्रकांत पाटील यांचा दावा; भितीपोटीच तिन्ही घटक पक्ष एकत्र

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ ः भाजपसमोर कधीच महाविकास आघाडीचे आव्हान असणार नाही. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन घटक पक्षांची एकत्र निवडणूक लढविण्याची भूमिका ही केवळ भीती आणि राजकीय अपरिहार्यतेतून पुढे आलेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागांवर एकावेळी निवडणूक होणार आहे. त्याचवेळी जागावाटप होताना या तीन घटक पक्षांचे सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असेल का, या अनुषंगाने ‘सकाळ’ने आज पाटील यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

लोकांची सेवा हाच उद्देश
विरोधकांचा मी सॉफ्ट टार्गेट आहे. पण त्याची मी पर्वा करत नाही. ‘‘नेत्याची इच्छा, ही तर आज्ञा’’ या भावनेने मी गेली ४० वर्षे संघटनेसाठी काम करतो आहे. आपल्याला मिळालेल्या संधीतून लोकांची सेवा करत राहणे हाच एकमेव उद्देश आहे. आताही केंद्राच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्याची सक्षम व्यवस्था उभारली आहे. राज्याच्या योजनांचीही जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कसबा, चिंचवडचा पक्षीय यंत्रणेतूनच निर्णय
ते म्हणाले, ‘‘पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने ब्राह्मण उमेदवार डावलल्याच्या प्रचारातही तथ्य नाही. या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याच घरातील उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी पक्ष आग्रही होता; पण मुक्ता टिळक यांच्या आजारपणात जनसंपर्काला मर्यादा आली. असेच अंदाज सर्वेक्षणातून समोर येत होते. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष टिळकवाड्यात जाऊन याबाबत टिळक कुटुंबीयांशी चर्चा करून निर्णय निश्चित केला. या सगळ्याबद्दल टिळक कुटुंबीयांना पूर्ण कल्पना दिली होती. त्यांना विश्वासात घेऊनच पक्षाने निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षात एक माणूस निर्णय घेत नसतो. पक्षाची निश्चित यंत्रणा आहे. त्यातूनच सर्व निर्णय घेतले जातात. चिंचवडमध्येही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती; परंतू, तेथे त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी सातत्याने पक्षाचे संघटन बांधून मतदारसंघावर पकड कायम ठेवली. त्यामुळे चिंचवडच्या बाबतीतही पक्षाच्या नेहमीच्या यंत्रणेतूनच निर्णय घेण्यात आला होता.’’

कसब्यात मतविभाजनात कमी पडलो
कसब्याच्या निकालाच्या निमित्ताने वेगवेगळे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला; पण त्यात तथ्य नाही. कसब्यात नेहमीच भाजप उमेदवारापेक्षा इतर पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मतांची संख्या अधिक होती. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना ५३ हजार मते पडली होती तर काँग्रेसचे उमेदवार रोहित टिळक आणि त्याचवेळी मनसेकडून निवडणूक लढविलेले रवींद्र धंगेकर यांना मिळून ८६ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही विरोधकांच्या मतांची बेरीज ८० हजार आहे. तर, बापट यांना पडलेली मते ७३ हजार होती. पण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतविभाजनाचा फायदा होऊन भाजपचे गिरीश बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. या वेळी मात्र थेट निवडणूक झाली. मतविभाजन करण्यात आम्ही कमी पडलो. यावेळी भाजपच्या हक्काच्या प्रभागातील मतदारांचे स्थलांतर, मतविभाजन नसणे, अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झालेली पोटनिवडणूक असे अनेक मुद्दे राहिले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com