धरणग्रस्तांचे पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणग्रस्तांचे पाणी बंद
धरणग्रस्तांचे पाणी बंद

धरणग्रस्तांचे पाणी बंद

sakal_logo
By

प्रकल्पग्रस्तांचेच पाणी बंद
जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील प्रकार; पाण्यासाठी जमिनी देणाऱ्या आंदोलकांतून संताप

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनींचा त्याग केला. त्याच जमिनींवर पाणीसाठा करून जिल्हा सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाला. त्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही त्यांना मिळाला नाही म्हणून सव्वीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलक महिला आणि पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृह वापरतात. मात्र, स्वच्छतागृहातील पाणी बंद करून आंदोलकांची अडवणूक करण्याचे धाडस जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या काहींनी केले आहे. ज्यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी मिळाले त्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी देण्याचे बंद करून आंदोलकांची हेटाळणी केली जात आहे.
चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या संकलनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यामध्ये काही मंत्रालय पातळीवर तर काही जिल्हा पातळीवरील प्रश्‍न आहेत. जिल्हा पातळीवरील प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रं-दिवस ठिय्या आंदोलन करत आहेत. प्रकल्पग्रस्त सकाळी किंवा इतरवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहांचा वापर करतात. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छतागृहातील पाणी बंद केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलांसह इतरांची मोठी कुचंबणा होत आहे. पाणी बंद केल्याबद्दल कोणीही उत्तर देत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणालाही विचारले तर आम्हाला माहिती नाही, असं म्हणून टाळले जात आहे. एकीकडे आंदोलन करणाऱ्या अडीचशे प्रकल्पग्रस्तांना मोफत भोजन, आरोग्य सुविधा देण्यासाठी दानशूर पुढे येत आहेत, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील पाणी बंद करून त्यांची अडवणूक केली जात असल्याचे चित्र आहे.
...
कोट
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असल्यापासून प्रकल्पग्रस्त याच कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर करत आहेत. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहातील पाणी बंद करून ठेवले होते. दोन दिवसांनंतर आज दुपारी ते सुरू केले. खासगी कर्मचाऱ्यांनी हे पाणी बंद केले होते. यामध्ये जिल्हा प्रशासनाचा काही संबंध नाही. तक्रार केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पाणी सुरू केले.
-मारुती पाटील, श्रमिक मुक्ती दल जिल्हाध्यक्ष