
फाटकवाडी प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा
फाटकवाडी प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २६ ः फाटकवाडी (ता. चंदगड) मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दूर्लक्ष केल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रकल्पांतर्गत फाटकवाडी व सडेगुडवळे येथील काही नागरिकांची जमीन, घर अधिग्रहण केले. त्यावेळी शासनाने पुनर्वसनासंदर्भात दिलेली आश्वासने तीस वर्षे होत आली तरी पाळलेली नाहीत. निर्वासित झालेल्या चौदा प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे सडेगुडवळे हद्दीत तर तेरा कुटुंबांचे गवसे- काजीर्णे हद्दीत स्थलांतरण केले. त्यावेळी प्रत्येक कुटुंबाला चार एकर जमीन आणि गावठाण देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. प्रकल्पामुळे घटप्रभा नदीतीरावरील अनेक गावात हरीतक्रांती झाली. परंतु ज्यांनी त्यासाठी जागा, जमीन देऊन त्याग केला त्या प्रकल्पग्रस्तांकडे आजही दूर्लक्षच आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदारांसोबत अनेकदा चर्चा झाल्या. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडला गेला. मात्र आता प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटला आहे. एक पिढी संपत आली तरी शासन त्यांना न्याय देत नसेल तर दुसऱ्या पिढीने हक्कासाठी लढाई करण्यातच आयुष्य खर्ची घालायचे का असा प्रश्न आहे. शासनाने तत्परता दाखवून प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्यांच्या नावे करुन द्याव्या अन्यथा प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गावडे, प्रभाकर फाटक आदींनी दिला आहे.