कचरावेचक महिला पोहोचली व्हिएतनामला

कचरावेचक महिला पोहोचली व्हिएतनामला

91607
कोल्हापूर : व्हिएतनामला जाण्यासाठी तयार झालेल्या संगीता लाखे.

कचरावेचक महिला पोचली व्हिएतनामला..
संगीता लाखे ठरल्या विशेष अतिथी; आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : त्यांची रोजची सकाळ उजाडते ती गल्लोगल्ली पडलेले प्लास्टिक, लोखंड गोळा करण्यात. मात्र आजची सकाळ त्यांच्यासाठी वेगळी होती. कारण त्यांची आजची सकाळ ही सातासमुद्रापार असलेल्या व्हिएतनाममध्ये झाली. तेही देशाच्या विशेष अतिथी म्हणून. व्हिएतनाममध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील कचरा वेचकांच्या परिषदेत कोल्हापूरातील कचरावेचक संगीता लाखे यांची निवड झाली. कालच या परिषदेसाठी त्या रवाना झाल्या आहेत.
संगीता लाखे या अवनि व एकटी संस्थेत कार्यरत असून कोल्हापूरातून अशी निवड होणाऱ्या त्या पहिल्या कचरावेचक महिला ठरल्या आहेत. अवनि व एकटी संस्थेतर्फे कचरा वेचकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच त्यांच्या अधिकारांविषयी जनजागृतीही केली जाते. याच जोरावर संगीता लाखेही व्यासपीठावर जाऊन कचरा वेचक महिलांचे पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेले कार्य आणि त्यांना सरकारकडून अपेक्षित सुविधा याविषयी आवाज उठवत आहेत. त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कामाची दखल घेऊन व्हिएतनाममध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये कचरा समस्या, त्यामध्ये कचरावेचकांचे योगदान, कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने निर्गतीकरण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, ईपीआर अमंलबजावणी, ८ एप्रिल २०१६ घनकचरा व्यवस्थापन कायदा त्यामधील कचरावेचकांसाठी करण्यात आलेले नियम यांची अंमलबजावणी या प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रश्नांची मांडणी करण्यासाठी कचरावेचक संघटनेच्या जिल्हाप्रमुख संगिता लाखे यांची निवड करण्यात आली. त्या सध्या व्हिएतनाम येथे कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या आहेत. ही परिषद दहा दिवस चालणार असून ते जगभरातील तज्ज्ञ मंडळी सहभागी झाले आहेत.
---------
चौकट
दुभाषकही सोबत
परदेशात होणाऱ्या परिषदेत इंग्लिश भाषेचा वापर केला जाणार आहे. यासाठी बेसिक इंग्लिश संगीता लाखे शिकल्या. मात्र कचरावेचकांचे प्रश्‍न विस्तृत स्वरूपात मांडण्यासाठी संस्थेने त्यांच्यासोबत दुभाषकाचीही व्यवस्था केली असून सातासमुद्रापारमधील कचरावेचकांच्या आंतरराष्ट्रीत परिषदेत त्या मराठीमध्ये कोल्हापूरातील कचरा वेचकांच्या कार्याचा आढावा घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com