पालिकेचे स्वतःकडेच नाही लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचे स्वतःकडेच नाही लक्ष
पालिकेचे स्वतःकडेच नाही लक्ष

पालिकेचे स्वतःकडेच नाही लक्ष

sakal_logo
By

gad265.jpg
91431
गडहिंग्लज : पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वाराचे स्लॅब कोसळल्याने अडथळे लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------

पालिकेचे स्वतःकडेच नाही लक्ष
---
जीर्ण इमारतीतून वाचनालय हलविले; गडहिंग्लज पालिकेच्या पोर्च पडझडीनंतर दुरुस्ती सुरू
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : इमारत धोकादायक बनल्याने येथील पालिकेचे साने गुरुजी वाचनालय अन्यत्र हलविण्यात आले. त्यातच पालिका कार्यालयाच्या पोर्चचाही स्लॅब कोसळला. पाठोपाठच्या या दोन घटनांनी शहरातील इमारतींच्या सुरक्षिततेचा अट्टाहास धरणाऱ्‍या पालिकेचे मात्र स्वतःच्या इमारतीकडेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.
साने गुरुजी वाचनालयाची चार दशकांपूर्वीची इमारत आहे. दोन वर्षांतील अतिवृष्टीतच या इमारतीला तडे गेले होते. तेव्हा पालिकेने याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंदाजपत्रकात यासाठी खास तरतूद करून तातडीने दुरुस्ती अगर नव्या इमारतीसाठी पाऊल उचलणे गरजेचे होते. त्यातही मुख्याधिकारीच प्रशासक असल्याने कोणताही अडथळा नव्हता. प्रत्यक्षात वाचनालय, शिक्षण मंडळ हे विभाग थेट नागरिकांशी संबंधित. तरीही यासाठी अंदाजपत्रकात नसलेली तरतूद टीकेचा विषय बनली आहे.
पालिकेच्या मुख्य इमारतीची वेगळीच कथा आहे. सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असणारी ही इमारतही जीर्ण झाली. पण, शहरातील धोकादायक इमारतींची निर्गत लावणाऱ्‍या पालिकेला मात्र स्वत:च्या इमारतीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. जीर्ण झालेली इमारत पाडून नव्याने उभारणी गरजेची असताना मध्यंतरी दोन वेळा केवळ नूतनीकरणच झाले. परंतु, इमारतीतील अपुऱ्‍या जागेसह गैरसोयींचा पाढा कायम आहे. त्यातच पोर्चचा स्लॅब कोसळल्याने अडथळे बांधून प्रवेश बंद करण्याची वेळ पालिकेवर आली. ही वस्तुस्थिती असतानाही वाचनालय व पालिका कार्यालयाच्या नव्या इमारतीबाबत कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने नागरिकांतून नाराजी आहे.
--------------------
नियोजनाचा अभाव
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समितीने वाचनालय इमारत धोकादायक झाल्याचे सांगितले होते. परंतु, त्या वेळी पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता वाचनालय स्थलांतरितांची वेळ आली. तीच अवस्था पालिकेच्या मुख्य इमारतीचीही आहे. नूतनीकरणावर झालेल्या खर्चात नव्या इमारतीची उभारणी झाली असती, असे जाणकारांचे मत बनले आहे. यावरून नियोजनाच्या अभावाचा फटका भुर्दंडात रूपांतरित होत असल्याचे बोलले जाते.

* पोर्चची दुरुस्ती सुरू
पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या पोर्चचा स्लॅब आठवड्यापूर्वी कोसळला. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. जीर्ण झालेला संपूर्ण स्लॅब काढून नव्याने पोर्चची रचना करण्यात येईल.
- सुधीर पोतदार, नगर अभियंता, नगर परिषद, गडहिंग्लज