आम्ही कोणाला उत्तर देवून वेळ वाया घालवत नाही

आम्ही कोणाला उत्तर देवून वेळ वाया घालवत नाही

91616

उत्तर देऊन वेळ वाया घालवत नाही
खासदार श्रीकांत शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला; कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः आम्हाला कोणाला उत्तर द्यायचे नाही. तेवढा वेळही नाही. उत्तर देऊन आम्ही वेळ वाया घालवत नाही. कारण, प्रत्येक मिनिट आमच्यासाठी महत्त्वाचा असून, लोकहिताची कामे करण्यावर आमचा भर आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज येथे सांगितले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास दिलेल्या भेटीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी एप्रिलपासून राज्यभर मेळावे घेणार असून, त्याला शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण यात्रेद्वारे उत्तर देणार का? या प्रश्नावर खासदार शिंदे म्हणाले, ‘‘आमचे सरकार समाजहिताचे निर्णय घेत आहे. कष्टकरी, शेतकरी, तरुणाई, सर्वसामान्यांसह विविध घटकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसमावेशक अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. लोकहिताची कामे करण्यावर आमचा भर असून, आम्हाला कोणाला उत्तर देऊन वेळ वाया घालवायचा नाही.’’
दरम्यान, खासदार शिंदे यांचे शिवालय परिसरात पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी, हलगीच्या कडकडाटात शिवसैनिकांनी जल्लोषी स्वागत केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन खासदार शिंदे यांचा सत्कार केला. ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी युवासेनेत प्रवेश केला. त्यात तेजस्विनी घाटगे, मंगेश चितारे, अक्षय घाटगे, नीलेश कसबे, रक्षंदा कसबे यांचा समावेश होता. शिवसेना करवीर उपतालुकाप्रमुख पदावर राजेंद्र सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर, पूजा भोर, गौरी माळदकर, पूजा कामते, मीना पोतदार, शिवाजी जाधव, रणजित जाधव, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, शिवाजीराव पाटील, बिंदू मोरे आदी उपस्थित होते.

चौकट
अंबाबाईच्या दर्शनाने दौऱ्याची सुरूवात
खासदार शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्याची सुरूवात श्री अंबाबाईदेवीचे दर्शन घेऊन केली. या दर्शनावेळी त्यांच्या आई लता, पत्नी वृषाली उपस्थित होत्या.

चौकट
२० हून अधिक संस्था-संघटनांनी दिली निवेदने
खासदार शिंदे यांनी खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानातील कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. खासदार शिंदे यांना विविध २० हून अधिक संस्था-संघटनांनी विविध मागण्यांची निवेदने दिली. त्यात माणगाव परिषद शताब्दी वर्षाचा कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी बौध्द समाज माणगावने केली. प्रस्तावीत वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी इचलकरंजी शहर व परिसर विविध संघटना व सर्वपक्षीय समन्वय समितीने केली. रि-पॅकर्स, रि-रेबलर्स यांना अन्न तपासणी अहवाल वर्षातून दोनवेळा अपलोड करण्याची अट, प्रस्तावीत वीज दरवाढ, गाळेधारकांचे भाडेवाढ रद्द करावी, आदी मागण्यांचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केली. र हे प्रश्न लवकर मार्गी लावले जातील, अशी ग्वाही खासदार शिंदे यांनी दिली. रवींद्र माने, जाखिरहुसेन भालदार, विजयसिंह देसाई, भाऊसाहेब आवळे, आदी उपस्थित होते.

चौकट
मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी खासदार शिंदे यांनी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. करवीर राज्याची सत्ता असलेल्या पन्हाळा येथे मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करणे. महाराणी ताराराणी यांच्या नावाने राज्य सरकारतर्फे पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार शिंदे यांनी दिली. माजी आमदार चंद्रदीप नरके, अमित कामत, सुशांत फडणीस, वसुधा पवार, डॉ. मंजुश्री पवार, प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com