स्पीड ब्रेकर की  बॅक ब्रेकर

स्पीड ब्रेकर की  बॅक ब्रेकर

91676
कोल्हापूर : गारगोटी हा राज्य महामार्ग आहे, पण पट्टे नसल्याने गतिरोधक दिसूनच येत नाहीत.
91677
कोल्हापूर : रिंगरोडवरील गतिरोधकाची अशी दुरवस्था झाल्यामुळे खड्डे की, गतिरोधक हे वाहन चालकांना कळत नाही.

अशास्त्रीय गतिरोधकांचा वाहनधारकांच्या पाठीला ‘दणका’
न्यायालयाच्या निकषाचे पालन नाही; जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर, ता. २७ : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र, या गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधकाची रुंदी आणि उंचीही प्रमाणित नसल्याने दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. खड्डे कमी म्हणून की काय रस्त्यावर अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या गतिरोधकांमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने गतिरोधकांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरातील रस्ते आणि खड्डे याचे समीकरण जगजाहीर आहे. खड्डे नसलेला रस्ता.. आणि गतिरोधक नसलेला रस्ताही दाखवता येणार नाही. शहरातील ९० टक्के गतिरोधक ‘आयआरसी’च्या (इंडियन रोड कॉँग्रेस) नियमांचा भंग केलेले आहेत. शहराचे मुख्य रस्ते सुमारे ५६ किलोमीटरचे, तर अंतर्गत रस्त्यांचे जाळे ११०० किलोमीटरचे आहेत. अंतर्गत रस्त्यांसह शहरात हजार बाराशेहून अधिक गतिरोधक असावेत. मुख्य रस्त्याला गतिरोधक असू नयेत, असा नियम असूनही एकट्या रंकाळा तलाव ते पुईखडी नाका या रस्त्यावर २७ गतिरोधक आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी पांढरे पट्टे किंवा सूचना फलक नाही. रंकाळा ते फुलेवाडी नाका रस्त्यावरील गतिरोधक लहान चारचाकी मोटारीचा तळभाग टेकणारीच आहे. रिंगरोडवरचे गतिरोधक विस्कटून खड्डेयुक्त डोंगरच झाले आहेत. 
कोल्हापूर-गारगोटी हा स्वामी विवेकानंद महामार्गावर विविध प्रकारचे गतिरोधक आहेत. कळंबा जेलसमोरील दोन मोठे गतिरोधकच मानकाप्रमाणे असावेत, परंतु त्या शेजारीच परत सिंगल रबरी गतिरोधक करून वाहनधारकांना पाठीला दणके बसण्याची सोय केली आहे. रबरी गतिरोधक तुटून लोखंडी नट वाहनांचे टायर खराब करतात. कळंबा जेलच्या पिछाडीहून रिंगरोडकडे जाणारा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असतानाही चढ रस्त्याला गतिरोधक केल्यामुळे वाहनधारकांची परीक्षाच असते. (पूर्वार्ध)
----------------
शासकीय निकष असे
- मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची रुंदी ३.७ मीटर म्हणजेच १२ ते १४ फूट रुंद असलेल्या गतिरोधकाची उंची ६ ते ८ इंच असावी.
- गतिरोधक ‘आयआरसी’नुसार निमुळते गोलाकार असायला हवेत. जेणेकरून वाहनांना २५ कि.मी.च्या गतीने पार यावेत
- गतिरोधकांच्या मागे किमान ४० फुटांवर गतिरोधकांची सूचना देणारा ठळक फलक असावा
---------------
चौकट
एक अभ्यास असाही
दरम्यान, गतिरोधकाशेजारी ५० टक्के अपघात झाले असल्याचा अभ्यास निष्कर्ष एप्रिल २०१९ मध्ये मुंबईच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढला आहे.
---------------
कोट
कायद्यानुसार कोठेही गतिरोधक नाहीत. जोड रस्त्यांना करण्याऐवजी मुख्य रस्त्यांना गतिरोधक केले आहेत. सूचना फलक आणि पट्टे नसल्याने पाठ दुखीचा त्रास सुरू झाले आहेत. वाहननुकसानीला आणि अपघातांना जबाबदार कोण, हे प्रशासनाने सांगावे.
- विजय घाटगे, वाहनधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com