कलापुरातील विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग

कलापुरातील विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग

लोगो - सांस्कृतिक कोल्हापूर
91741
कोल्हापूर : लंडन येथील प्रयोगासाठी निवड झालेल्या कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसह विजयंता चोपडे, शोभा तावडे, कौस्तुभ बंकापुरे, अंजली मेळवंकी आदी.

कलापुरातील विद्यार्थ्यांचा
लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग
तीन मे रोजी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमध्ये प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : पुणे येथील अप्लाईड थिएटर इंडिया फाउंडेशन या संस्थेला लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन या संस्थेचे नाट्य सादरीकरणासाठी निमंत्रण मिळाले आहे. त्याअंतर्गत येथील कोल्हापूर पब्लिक स्कूल या शाळेतील आठ विद्यार्थी फोरम थिएटर हा नाट्यप्रकार लंडनमध्ये सादर करणार आहेत.
फाऊंडेशनचे संचालक कौस्तुभ बंकापुरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अप्लाईड थिएटर हा विषय भारतीय समाजामध्ये तुलनेने नवीन आहे. विविध एनजीओ, शाळा आणि संस्था यांच्यासोबत विविध सामाजिक विषयावर अप्लाईड थिएटरच्या मदतीने फाउंडेशन काम करीत आहे. या विषयाचे महत्व कळावे आणि याचा प्रचार आणि प्रसार विद्यार्थ्यांपासून व्हावा म्हणून हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प फाउंडेशनने सुरू केला आहे. निवडक आठ विद्यार्थांचे प्रशिक्षण चालू असून ३ मे रोजी हे विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन येथे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर हे विद्यार्थी शेक्सपियर ग्लोब थिएटर, ब्रिटिश म्युझियम, नॅशनल आर्ट गॅलरी अशा विविध सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यामधून त्यांना परदेशातील सांस्कृतिक आणि कलात्मक पद्धती लक्षात येतील तसेच या निमित्ताने एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल.’’
कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापिका शोभा तावडे म्हणाल्या, ‘‘शाळा नेहमीच मुलांना वेगळा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत असते. यामध्ये अभ्यासाबरोबरच क्रीडा, स्काऊट, परदेशी भाषा यासोबतच हा नाट्य उपक्रम फौंडेशनच्या मदतीने राबविला आहे. असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा आहे आणि यापुढे देखील हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आम्ही करत राहू.’’
यामध्ये तन्वी पाटील, जान्हवी जोशी, श्रेया मोरे, मुग्धा पोतदार, काव्या शहा, धनश्री साठे, ओजस शिंपळे, सम्यक पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना फाउंडेशनचे कौस्तुभ बंकापुरे, युवराज केळुस्कर आणि मुख्याध्यापिका अंजली मेळवंकी यांचे मार्गदर्शन मिळाले.
------------
91667
कोल्हापूर : आनंदयात्री परिवारातर्फे सादर झालेल्या कलाविष्कारातील एक प्रसंग.

दोन कलाविष्कारांचे
‘जाणिव’तर्फे सादरीकरण
कोल्हापूर, ता. २७ : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणि चॅरिटेबल फाउंडेशन संचलित आनंदयात्री उपक्रमांतर्गत दोन कलाविष्कार सादर झाले. प्रत्यय निर्मित ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’ हे अभिवाचन सादर झाले. सतीश आळेकर लिखित या कथेचे सादरीकरण सुहास लकडे आणि रोहित पोतनीस यांनी केले. त्यानंतर विपुल देशमुख लिखित दिग्दर्शित ‘अंतसे तह तक’ हा हिंदी नाट्याविष्कार सादर झाला. राजन जोशी यांनी तो सादर केला.
बुद्ध आणि त्यांचे विचार या सादरीकरणातून अधोरेखित केले होते. अजिंक्य यादव यांनी याचे संगीत केले. अक्षय सुतार, शुभम चौगुले, ओंकार मासरणकर, ओंकार पाटील यांनी रंगमंच व्यवस्थापन पाहिले. समीर पंडितराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद कुलकर्णी यांनी आनंदयात्री उपक्रमाबाबत माहिती दिली आणि इतर संस्थांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘जाणिव''चे मनिष देसाई आणि ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी कलाकारांचे सत्कार केले.
---------------
91673
कोल्हापूर : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शाश्वत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. नंदकुमार रानभरे यांचा सत्कार केला. या वेळी रवींद्र मोरे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अजय पाटील, अविनाश टकळे, निखिल जाधव, राजेंद्र गोते आदी.

रंगकर्मी प्रा. रानभरे यांचा
शाश्‍वत प्रतिष्ठानतर्फे सत्कार
कोल्हापूर, ता. २७ : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शाश्‍वत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. नंदकुमार रानभरे यांचा सत्कार करण्यात आला. दिनाचे औचित्य साधून प्रा. रानभरे यांचा सत्कार रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुत होते. नव्या पिढीने नाट्य चळवळ पुढे न्यावी, कलाकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत असे आवाहन प्रा. रानभरे यांनी केलं. यावेळी अविनाश टकळे, निखिल जाधव, राजेंद्र गोते, भालचंद्र सावंत, सुनील दावणे, अविनाश कुलकर्णी आदी उपस्थित होते. अजय पाटील यांनी आभार मानले.
-----------
91825
कोल्हापूर : देवल क्लबमध्ये रंगलेल्या एकांकिकेतील एक प्रसंग.

देवल क्लबतर्फे
रंगल्या दोन एकांकिका
कोल्हापूर, ता. २७ : येथील गायन समाज देवल क्लबतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आज ऋषीकेश तुराई लिखित व अवधूत सावंत दिग्दर्शित ‘माणूस बनवून मिळेल’ आणि योगेश सोमण लिखित व श्रीजिवन दिग्दर्शित ‘एक एप्रिल’ या एकांकिका सादर झाल्या. श्रीजीवन तोंदले, अर्जुन पिसाळ, सागर कोळी, ऋषीकेश पाटील, असिफ सनदे, ओंकार सोनावणे, सृष्टी सलागरे, अनुपम दाभाडे आदींनी सयोजन केले. दरम्यान, एक एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून प्रशिक्षण घेतलेल्या अभिनेत्री पायल पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य शिबिर होणार आहे. जास्तीत जास्त रंगकर्मींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य शाखाप्रमुख उमा नामजोशी यांनी केले आहे.
------------------०४५९७
कोल्हापूर : युथ डेव्हलपमेंटचे फाउंडेशनतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कलाकार व तंत्रज्ञांचे सत्कार झाले.

‘युथ डेव्हलपमेंट’तर्फे
कलाकार, तंत्रज्ञांचे सत्कार
कोल्हापूर, ता. २७ : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त येथील युथ डेव्हलपमेंट फाउंडेशतर्फे मकरंद लिंगनुरकर, अवधूत जोशी, मंजुषा खेत्री, सचिन वारके, बाळकृष्ण शिंदे आदी कलाकार व तंत्रज्ञांचे सत्कार झाले. कलाकारांना लोकाश्रयाची गरज असून सजग नागरिक म्हणून ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा या वेळी वैभवी जरग यांनी व्यक्त केली.
तळंदगेचे सरपंच संदीप पोळ, डॉ. रोहन चौधरी यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. ओंकार हिरेमठ यांनी आभार मानले. फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, संदीप जाधव, निवास भोसले, हेमंत जोशी, शितल नलवडे, डी. ए. शिदे, चिंतामणी केळकर, अभय नेरलेकर यांनी संयोजन केले.┵┵

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com