
गीतरामायण
91826
संपूर्ण गीतरामायण मैफलीला प्रारंभ
---
‘मंगलधाम’मध्ये मिळणार सलग चार दिवस पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : येथील ब्राह्मण सभा करवीर आणि स्वरब्रह्म संस्थेतर्फे रामनवमीनिमित्त आजपासून संपूर्ण गीतरामायण मैफलीला प्रारंभ झाला. ‘मंगलधाम’मध्ये सलग चार दिवस रसिकांना या मैफलीची पर्वणी मिळणार आहे. रोज सायंकाळी साडेपाचला मैफलीला प्रारंभ होईल.
सुधीर जोशी, श्रीधर जोशी, माधवी देशपांडे, रोहित जोशी, अनुजा नाईक, चित्रा कुलकर्णी, पौर्णिमा टोपकर, रविराज पोवार यांनी आज पहिल्या दिवशी विविध गीते सादर केली. त्यांना विजय पाटकर, केदार गुळवणी, नरेंद्र पाटील, परेश गाडगीळ, रेवा गाडगीळ आदींची साथसंगत होती. आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर, भावतीर्थ सुधीर फडके यांनी साकारलेल्या गीतरामायणातील सर्व ५६ गीते, त्यातील सर्व कडव्यांसह सादर होणार आहेत. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
रामनवमीनिमित्त सामुदायिक रामरक्षा पठण
रामनवमीनिमित्त आज अंबाबाई मंदिरातील राम मंदिर परिसरातील रामाच्या पारावर सामुदायिक रामरक्षा पठण झाले. पाचशेहून अधिक महिलांचा त्यामध्ये सहभाग होता. श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम झाला, असे नंदकुमार मराठे यांनी सांगितले.