
अतिरिक्त पाणीपट्टी वसूल केल्याची नागरिकाची तक्रार
अतिरिक्त पाणीपट्टी वसूल
केल्याची नागरिकाची तक्रार
गडहिंग्लज, ता. २८ : नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने नियमबाह्य अतिरिक्त पाणीपट्टी वसूल केल्याची लेखी तक्रार अवधूत बाटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, तीन महिन्याची पाणीपट्टी यापूर्वी २५० रुपये येत होती. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याची पाणीपट्टी ७५० रुपये वसूल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पाणीपट्टी नऊ महिन्याचे असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात ही पाणीपट्टी तीन महिन्याची असल्याचे सांगूनही कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला. यामुळे बाटेंनी ७५० रुपये भरले. त्यानंतर चौकशी केली असता मीटर बंद असल्याने अतिरिक्त पाणीपट्टी वसूल केल्याचे म्हटले. मात्र पाणीपट्टी मागणी बिलामागे लिहिलेल्या नियमात मीटर नादुरुस्त असल्यास लगतच्या सहा महिन्यातील पाणीपट्टी आकारण्यात येईल असे म्हटले आहे. या नियमानुसार तीन महिन्याची पाणीपट्टी २५० रुपयेच होते. परंतु ७५० रुपये वसूल केले आहेत. अतिरिक्त भरलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जल अभियंता अनिल गंदमवाड म्हणाले, ‘मीटर नादुरुस्त असला तरी हा प्रकार मीटर फेरफारमध्ये मोडतो. त्या नियमानुसार बाटे यांच्याकडून तिप्पट पाणीपट्टी वसूल केली आहे.’