४ चोरटे अटक - सव्वाचार लाखांचे दागिणे हस्तगत

४ चोरटे अटक - सव्वाचार लाखांचे दागिणे हस्तगत

कुरीयरमधून दागिणे लुटणाऱ्या चौघांना अटक
सव्वाचार लाखांचे दागिणे जप्त; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः तब्बल १७ गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी चार दिवसांपूर्वी महाद्वार रोड परिसरातील अंगडीया कुरीयर सर्व्हीसेसमधून कर्मचाऱ्यांना मारहाण करून दागिणे लुटले होते. त्यांच्याकडून सहा तोळे सोने, अडीच किलो चांदी असा सुमारे चार लाख २७ हजार ७० रुपयांचा ऐवज आणि दोन मोपेड असा एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी आज दिली.
पोलिसांनी सांगितले, की नवनाथ उर्फ निखील किशन सरगर (वय २८ रा. साईमंदिर जवळ, सुभाषनगर), सचिन शिवाजी आगलावे (वय २१ रा. शाहू कॉलनी, गल्ली नंबर तीन, विक्रमनगर), महेश रमेश भोरे (वय २२ रा. रेणुका कॉलनी, उजळाईवाडी, ता.करवीर), आसिफ अकबर मुजावर (वय २८ रा. जमादार कॉलनी, कदमवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सत्येंद्रसिंग सुरेशसिंग शिकरवार (मुळ मध्यप्रदेश, सद्या महद्वाररोड कसबा गेटजवळ)यांनी दिली आहे.
२४ मार्चला रात्रीसाडेनऊच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी दुकान बंद करीत होते. त्यावेळी तेथे दुचाकीवरुन चौघे आले. यापैकी दोघे कुरीअर सेंटरमध्ये गेले व कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचवेळी दोघे दुकानाबाहेरच रेकी करत होते. सेंटरमध्ये गेलेल्या दोघांनी कामगारांना बोलण्यात गुंतवले. यावेळी रेकी करणाऱ्या दोघांकडून दुकानात जावून कर्मचाऱ्यांच्या हातातील सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून जात होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्‍याचा प्रयत्न केला तेव्हा संशयित आरोपींनी फिर्यादी व कर्मचाऱ्यांना हातानेच मारहाण करून ते दागिण्यांसह पळून गेले होते. यानंतर याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.

साथीदाराने नावाने हाक
मारल्यामुळे तपास सुलभ
तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी अधिक माहिती घेतली तेव्हा लुटमार करणाऱ्यांपैकी एकाचे नाव निखील सरगर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याच नावाने त्याला त्याच्या साथीदाराने हाक मारल्याचमुळे हे नाव लक्षात राहिल्याचेही त्यांनी सांगितले. हाच धागा पकडून पोलिसांनी २४ तासात निखील सरगरला ताब्यात घेले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानतर त्याने इतरांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोपेडसह त्यांना अटक केली.
-----
एकावर १७ गुन्हे दाखल
अटक केलेल्या चौघांपैकी सचिन आगलावे याच्यावर एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. राजारामपुरी, गांधीनगर, शाहूपुरी आदी ठिकाणी त्याच्यावर खुन, खुनी हल्ला यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार महेश भोरे हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच नवनाथ उर्फ निखील सरगरवर सोलापूर येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com