लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेख
लेख

लेख

sakal_logo
By

कागलकरांचे हिंदकेसरी हसन मुश्रीफ


असं म्हणतात अपयश यशाची पहिली पायरी आहे. हे वाक्य हसन मुश्रीफ यांना तंतोतंत लागू पडते. स्व. सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी अवघ्या वर्षासाठी पोटनिवडणूक झाली. यावेळी मुश्रीफ यांना विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पहिली संधी मिळाली. पहिल्याच निवडणुकीत मुश्रीफ यांचा सात हजार मतांनी पराभव झाला. या पराभवाने ते खचले नाहीत. एका वर्षात त्यांनी राजकारणात चांगला जम बसवला. लोकांत जनसंपर्क होता, तो अधिक मजबूत केला अन् पुढील निवडणुकीत मुश्रीफ साडेतीन हजार मताधिक्याने विधानसभेत निवडून आले. या विजयानंतर लोकसेवेची परिक्रमा जी सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे... १९९९ पासून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत. विशेष बाब म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा प्रचंड प्रभाव असूनही हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कागलची एकमेव जागा राखली होती.
-----------------

मुश्रीफ विद्यार्थीदशेपासूनच चळवळीत सक्रिय होते. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी कधीच जातीपातीचं, धर्माचं राजकारण केले नाही. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते. महाराजांची प्रत्येक जयंती ते आजतागायत उत्साहात साजरी करतात. त्यांच्याकडे नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी असताना तीर्थक्षेत्र योजनेच्या माध्यामातून त्यांनी कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. राज्यातील उत्कृष्ट बांधकाम असलेले संगमरवरी पहिले राम मंदिर बांधण्यात मुश्रीफांचा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी ३ कोटींचा निधी मुश्रीफ यांनी उपलब्ध करून दिला होता. म्हणूनच त्यांचे समर्थक असो अथवा विरोधक कोणीही धर्माच्या चष्म्यातून त्यांना पाहू शकले नाही.
इस्लामपूरचं आणि कागलचं वेगळं नातं आहे. माझं आणि मुश्रीफ साहेब यांचं वेगळं नातं आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मी कुठेही असलो तरी शेवटची सभा ही मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातच घेतो आणि विजयाची सभाही कागलमध्येच होते. हा नित्याचा उपक्रम सलग पाच टर्मपासून चालत आला आहे. मविआ सरकार असताना सांगली जिल्ह्यात मी ‘मॉडेल स्कूल’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा आम्ही बदलून टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवे म्हणून शाळांचा, शिक्षकांचा दर्जा वाढवला. या कामात ग्रामविकासमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांचे मोठे योगदान मिळाले.
मुश्रीफांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यामध्ये उल्लेखनीय काम केलं. त्याचा राज्यभर फायदा झाल्याचं चित्र पाहायला मिळते. उदाहरण सांगायचे झाले तर मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू आणि गरीब रुग्णांना १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला. त्यामुळं कॅन्सर आणि इतर रोगांवर खर्चिक शस्त्रक्रियाही कमी दरात होऊ लागल्या. त्याचा आजही ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होत आहे. लोकांच्या तोंडाकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहत, येणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करायची, असं मुश्रीफ नेहमीच म्हणतात. याच कारणामुळे ४० वर्षांपासून दररोज सकाळी सहापासून मुश्रीफ यांच्या घराबाहेर लोकांची रीघ लागलेली असते. हा मान, हे प्रेम, ही आपुलकी प्रचंड झिजल्यानंतर मिळते आणि हे मुश्रीफांनी त्यांच्या कामाच्या जोरावर कमावले आहे.
आज देशात विचित्र परिस्थिती आहे. अघोषित आणीबाणी पुकारली गेली आहे. स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम केले जात आहे. यात मुश्रीफ यांनाही त्रास दिला जात आहे. या परिस्थिती विरोधात रोखठोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख आहे. भाजपच्या कोणत्याही चुकीच्या धोरणाविरोधात निर्भिडपणे आवाज उठवण्याचे काम मुश्रीफ यांनी केले आहे. म्हणूनच आज हसन मुश्रीफ यांना खोट्या आरोपाखाली फसवण्याचे कुभांड रचले जात आहे. मला विश्वास आहे की, कागलकरांचे अढळ स्थान असलेले हे हिंदकेसरी सत्याच्या जोरावर कटकारस्थानाला हाणून पाडतील.
--------------------------
- आमदार जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस