लक्ष्मी तलाव टेकडीवरील विश्रामगृह बेवारस स्थितीत

लक्ष्मी तलाव टेकडीवरील विश्रामगृह बेवारस स्थितीत

अडगळीतील विश्रामगृहे भाग- ३

02242
राधानगरी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची अशी दुरवस्था झाली आहे. (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)


लक्ष्मी तलाव टेकडीवरील विश्रामगृह बेवारस स्थितीत
टुमदार इमारत; वेळोवेळी लाखांत खर्च तरी दुरवस्था, गांभीर्य हवे
मोहन नेवडे : सकाळ वृत्तसेवा
राधानगरी ता. २९ : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रमणीय विश्रामगृहापैकीच एक राधानगरी येथील विश्रामगृह. पर्यटनवाढीला वाव देणारे ठिकाण म्हटले वावगे ठरणार नाही. राधानगरी ‘लक्ष्मी’ तलावाच्या समोर उजव्या टेकडीवर ही टुमदार इमारत आजही दुर्लक्षित आहे. या विभागाला या विश्रामगृहाचे गांभीर्यच नाही, अशी स्थिती दिसत असल्याने त्यालाही कुलूप लागले आहे.
राधानगरीमध्ये येणारा पर्यटक सर्वात आधी पसंती देतो तो शाहूकालीन लक्ष्मी तलाव पाहण्यासाठी. एक ऐतिहासिक इमारत, देशातील मॉडेल धरण व निर्सगरम्य परिसर म्हणून याकडे पाहिले जाते. सबंध दगडी चुना आणि शिशवमध्ये असलेले हे धरण एक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. म्हणूनच याला पर्यटक आवर्जुन भेट देतात. राधानगरी कोकण राज्य मार्गावरून जाताना उजवीकडे धरणाकडे रस्ता जातो आणि त्याच ठिकाणावरून डावीकडे उंच टेकडीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे टुमदार वसतीगृह लक्ष वेधून घेते. या चौकात थांबल्यानंतर डावीकडे पाहिल्यास उंच उंच निलगिरीची झाडे, काजूची झाडी याच्या मधोमध ही इमारत आहे.
१९९० ला तत्कालीन राज्यमंत्री प्रकाश आवाडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‍घाटन झाले. दोन निवासी कक्ष भोगावती आणि तुळशी असे त्यांचे नामकरण. मध्यवर्ती एक भोजन कक्ष. समोर छोटीशी बाग. निवांतपणासाठी बाकड्यांची सोय आणि त्या बागेला वळसा मारून बाहेर पडण्याचा मार्ग. इमारत छान आहे. मात्र त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हवे तितके लक्ष दिसत नाही. वेळोवेळी लाखात खर्च झाले, पण विश्रामगृह सुस्थितीत ठेवण्याबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या वर्षभरापासून हे विश्रामगृह बेवारस स्थितीत आहे. सुरक्षा रक्षकाबाबतही साशंकता आहे. मध्यंतरी पाणी नसल्याच्या कारणावरून चालवायला दिलेले हे विश्रामगृह सध्या बंद केले. त्यानंतर याला अवकाळा आली.
---------
चौकट
...तर पर्यटकांची होईल व्यवस्था
अलीकडे अधून-मधून डागडूजी केली जाते पण म्हणावी तितकी गती चालवण्याच्या दृष्टिकोनातून दिसत नाही. इमारतीच्या प्रांगणात बसल्यानंतर समोर लक्ष्मी तलावाची दगडी भव्य भिंत लक्ष वेधते. निळाशार जलाशय आणि राजर्षी शाहुंच्या जिवंत स्मारकाची भव्यता उर भरून आणते. निदान हे विश्रामगृह सुरू केले तरी काही पर्यटकांची व्यवस्था होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com