एकलव्य होवून नवी कौशल्ये आत्मसात करा!

एकलव्य होवून नवी कौशल्ये आत्मसात करा!

फोटो-92244
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षान्त समारंभात बुधवारी विद्यार्थी महेश बंडगर याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक डॉ. संजय धांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. प्रमोद पाटील, संचालक डॉ. अजितसिंह जाधव आदी. (मोहन मेस्त्री ः सकाळ छायाचित्रसेवा)
92249
कोल्हापूर ः कुलपतींचे सुवर्णपदक डॉ. संजय धांडे यांच्या हस्ते स्वीकारताना सोहम जगताप.
92255
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षान्त समारंभात बुधवारी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
92257
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभात बुधवारी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी मार्गदर्शन केले.


एकलव्य होऊन नवी कौशल्ये आत्मसात करा!
डॉ. संजय धांडे; नव्या युगात निरंतर शिक्षण हाच यशाचा मंत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः विद्यापीठीय शिक्षणानंतर आपण आता लाईफ लाँग लर्निंग या (थ्री-एल) युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेत आहात. इथे ना लेक्चर आहेत, ना परीक्षा आहेत. दररोजचा दिवस नवी कौशल्ये आत्मसात करायला लावणारा आहे. अशा नव्या युगातील डिजिटल एकलव्य होऊन नवी कौशल्ये आत्मसात करा आणि शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा, असा यशाचा बीजमंत्र भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे यांनी आज येथे नवपदवीधरांना दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षस्थानी उपस्थित होते. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील समारंभात सावे (ता. सांगोला) येथील महेश बंडगर याला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील सोहम जगताप याला कुलपती सुवर्णपदक डॉ. धांडे यांच्या हस्ते प्रदान केले. कोरोनानंतर दोन वर्षांनी केंद्रीय पद्धतीने दीक्षान्त समारंभ यंदा विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत आणि उत्साही वातावरणात झाला. यावर्षी एकूण ६६ हजार ४५६ स्नातकांना पदवी प्रदान केली.
डॉ. धांडे म्हणाले, ‘‘कोरोनानंतर जगातील बदलांचा वेग वाढला आहे. त्यात कौशल्यांना मोठी मागणी आहे. एकलव्याप्रमाणे नवी कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण ठरणार आहे. त्यादृष्टीने पदवीधरांनी कौशल्य शिकण्याची आणि आत्मसात करण्याची भूक, उत्कट निरीक्षणे, प्रश्नोत्तरे- संवाद, कुतूहल, सराव, शिस्त या पैलूंद्वारे नव्या युगातील डिजिटल एकलव्य व्हावे. थ्री-एल युनिव्हर्सिटीतील अनुभव या शिक्षकाच्या माध्यमातून आयुष्यभर शिक्षण घेऊन समृद्ध जीवनाच्या दिशेने वाटचाल करावी.’’
राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘ज्ञान हे धन आहे. ते जेवढे खर्च कराल, तेवढे वाढते. ज्ञानाच्या माध्यमातून चारित्र्य घडते. शिक्षण परिवर्तनाचे मोठे साधन आहे. त्यामुळे निरंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी व्हा. नवीन शैक्षणिक धोरणाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणीवर विद्यापीठांनी भर द्यावा. काही विभागांना सेंटर ऑफ एक्सलन्स करावे. एनआयआरएफ रँकिंग वाढवावे. राष्ट्रनिर्माण कार्यात विद्यापीठ, विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे.’’
यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल मांडला. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी विद्यापीठाला सहकार्य करावे. विद्यापीठाची गुणवत्ता, दर्जा सातत्याने वाढविण्याचा निर्धार आपण सर्वांनी करूया, असे आवाहन त्यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी विविध पदवी अभ्यासक्रमांची माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, विविध विभागांचे अधिष्ठाता, अधिकार मंडळांचे सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. नंदिनी पाटील, धैर्यशील यादव, सुश्‍मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

चंद्रकांत पाटील विद्यापीठातून पुण्याला रवाना
या समारंभासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यापीठात आले. त्यांनी प्रमुख पाहुणे, कुलगुरू आणि व्यवस्थापन व विद्यापरिषदेच्या सदस्यांची भेट घेतली. तेथून ते दीक्षान्त मिरवणुकीत सहभागी झाले, पण अचानक भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच मंत्री पाटील तेथून पुण्याला रवाना झाले.
.......................................................................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com