कृती समिती निवेदन

कृती समिती निवेदन

92335
कोल्हापूर : महापालिकेतील अधिकाऱ्याच्या बदलीबाबतच्या आदेशाची महाविकास आघाडीचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी महापालिकेसमोर होळी केली.

अधिकाऱ्यांच्या बदलीचे पडसाद
‘महाविकास आघाडी’कडून आदेशाची होळी; कामकाज बंद पाडण्याचा इशारा
कोल्हापूर, ता. २९ : महापालिकेतील अधिकाऱ्याच्या बदलीबाबत सरकारने काढलेला आदेश तसेच सहायक आयुक्तपदाचा सोपवलेल्या कार्यभाराचे पडसाद आज उमटले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी महापालिकेसमोर सरकारच्या आदेशाची होळी केली. ३ एप्रिलपर्यंत आदेश मागे घेतला नाही तर महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद पाडले जाईल, असा इशाराही दिला. तसेच डॉ. विजय पाटील यांच्याकडे सहायक आयुक्तपदाच्या दिलेल्या कार्यभाराला संघटना, माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे.
महाविकास आघाडीतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनील मोदी, कॉँग्रेसचे गटनेता शारंगधर देशमुख यांनी ही हुकुमशाही असल्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. निवेदनात शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या बदलीचा सरकारने काढलेला आदेश नियमबाहय असून महानगरपालिकेच्या स्वायत्तेवर घाला घालणारा आहे. सरनोबत यांची नियुक्ती महासभा व शासनाच्या मान्यतेने, कायद्याने केली होती. नियमांचे पालन न करता काढलेला आदेश सरकारने त्वरीत मागे घ्यावा. त्याबाबतच्या पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या भावना सरकारला कळवाव्यात. आदेश मागे न घेतल्यास महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद पाडले जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर महापालिकेसमोर जमून घोषणा देत आदेशाची होळी केली. या वेळी ॲड. गुलाबराव घोरपडे, आदिल फरास, ईश्‍वर परमार, जयश्री चव्हाण, पूजा नाईकनवरे, प्रतिज्ञा उत्तुरे, संजय मोहिते, रमेश पुरेकर, अनिल पाटील, सुशील भांदिगरे, अर्जुन माने आदी उपस्थित होते.
-----------
ठेकेदार, लोकप्रतिनिधींवरही
कारवाई करा : कृती समिती
कोल्हापूर : शहर व जिल्हा नागरी कृती समितीने खराब रस्त्यांबाबत केवळ शहर अभियंता दोषी नसून त्यासाठी जबाबदार ठेकेदार, लोकप्रतिनिधींवरही कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे पाठवले. त्यात म्हटले आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांना काही तासांत खराब रस्त्यांची जाणीव झाली. त्याला जबाबदार ठरवून शहर अभियंत्यांवर कारवाई केली. त्यांच्याशिवाय जबाबदार ठेकेदार, लोकप्रतिनिधींवर कारवाई झाली नाही तर वशिलेबाजी केल्यासारखे होईल. चांगल्या रस्त्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली तरी अधिकारी, लोकप्रतिनिधी ढुंकूनही पाहिलेले नाही. पिण्याचे पाणी, हद्दवाढ, हायकोर्टाचे खंडपीठ तसेच विकास नावाचे कोणतेच काम झालेले नाही. त्यामुळे नवीन कामे करण्याबरोबर ५० वर्षे प्रलंबित असणारे प्रश्नही तातडीने सोडवावेत. अशोक पोवार, रमेश मोरे, विनोद डुणुंग, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, महेश जाधव, राजाराम कांबळे, अजित सासने आदींची निवेदनावर नावे आहेत.
--------------------
सहायक आयुक्तपदाबाबत
पुनर्विचाराची ठाणेकर यांची मागणी
कोल्हापूर : भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तसेच वेतनवाढ थांबवण्याची कारवाई झालेल्या डॉ. विजय पाटील यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे, अशा अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपविल्याने प्रशासकीय व्यवस्था भ्रष्ट आणि महानगरपालिकेला खड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेल्याचे द्योतक आहे. प्रशासकांनी त्वरित या निर्णयाचा पुनर्विचार करावा. डॉ. विजय पाटलांपेक्षा अधिक लायक अधिकाऱ्याकडे पदभार द्यावा.
त्याबरोबरच भ्रष्ट व बेजबाबदार अधिकाऱ्याला सहायक आयुक्तपदी नेमण्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी निवेदनाद्वारे विरोध केला आहे. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र छापल्या प्रकरणी डॉ. विजय पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही केली आहे. निवेदनात म्हटले आहे, बोगस प्रमाणपत्राबाबत कारवाई न करता पदोन्नती देऊन वेळोवेळी वाचवण्यासाठी खटाटोप सुरू आहेत. पुरावे असूनही नऊ महिने झाले तरी कारवाई केली नाही. हे गंभीर प्रकरण असून अन्न औषध प्रशासनास कायदेशिर कारवाई करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी. तसेच त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com