
निवडणूक विभागाचा ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे
जिल्ह्यातील ८० वर्षावरील
मतदारांचे सर्वेक्षण सुरू
६३ हजारांची पडताळणी पूर्ण, १० दिवस मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः जिल्ह्यातील मतदार यादीचे काम निवडणूक विभागामार्फत सुरू आहे. या अंतर्गत ८० वर्षांवरील व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. हयात नसलेल्या व्यक्ती, नाव आणि छायाचित्रातील बदल या अंतर्गत केले जाणार आहेत. अत्तापर्यंत ६३ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण झाले असून, त्यातील ६ हजार ४८८ जणांनी नावे आणि फोटोतील बदलासाठी अर्ज दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मोहीम राबवून घराघरातून माहिती घेतली जात आहे. यामध्ये हयात नसणाऱ्या मतदारांचे नाव चगळण्याबरोबरच वय दुरुस्तीचेही अर्ज भरुन घेतले जात आहेत. आतापर्यंत नाव वगळण्यासाठीचे ६३९६ अर्ज आले आहेत. यासाठी नमुना क्रमांक ७ भरुन घेतले आहेत. त्याचबरोबर वय दुरुस्ती, फोटो दुरुस्तीसाठी नमुना क्रमाक ८ भरुन घेण्यात आले असून, याचे ६४८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.