जगणं तृतीयपंथीयांचं

जगणं तृतीयपंथीयांचं

लोगो- जगणं तृतीयपंथीयांचं ः भाग- एक

लीड
कोरोना काळात सर्वच घटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे; मात्र, तृतीयपंथीयांचे जगणे ढवळून निघाले. त्यांची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं पुढे काय झालं, त्याचा विविध अंगांनी घेतलेला धांडोळा.

आणखी किती वर्षे गावापुढं पदर पसरायचा?
समाजाकडूनही अवहेलनाच ः मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हवी धोरणांची ठोस अंमलबजावणी

संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः ‘हो. आम्ही भीक मागतो...देवीचा जग घेऊन दारोदारी आमच्यापैकी काहींना फिरावे लागते...कुणी सेक्स वर्कर म्हणून काम करतात तर कुणी पडेल ती कामं करण्याची तयारीही ठेवली आहे. पण, अजूनही समाजाची मानसिकता बदलायला तयार नाही. कुठे नोकरी मिळाली तरी सुरक्षिततेची हमी नाही. शासनाकडून काही निर्णय जरूर घेतले जातात. पण, त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. आता तुम्हीच सांगा आम्ही आणखी किती वर्षे गावापुढं पदर पसरत रहायचं?’ ‘‘तृतीयपंथींयांच्या या वेदना उलगडताना त्यांचं एकूणच जगणंही समोर उभं राहतं. कोरोना काळात सर्वच घटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले; पण नंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे; मात्र, या ‘तिसऱ्या जगाची’ परिस्थिती काय आहे, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक बाबी प्रकर्षानं पुढे आल्या आहेत.
‘सध्या सर्वत्र जत्रा-यात्रांचा धुरळा उडाला आहे आणि या ठिकाणी आमची काही साडीवाली तृतीयपंथीय मंडळी भीक मागताना आवर्जुन भेटतात. गर्दी असणाऱ्या मंदिरांबाहेर काही मंडळी दिसतात. कधी कधी त्यांच्याकडून पैसे देण्यासाठीचा अट्टाहास इतका असतो की काहीजण नाकं मुरडतात. शिव्या-शापही देतात. पण, समाजच आम्हाला अजूनही स्वीकारायला तयार नाही. शासनाकडून आत्ता कुठे काही सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे. पण, त्यातही काही तांत्रिक अडचणी येतात. आमचं जगणं स्थिरस्थावर होईपर्यंत आमच्यापुढे दुसरा पर्याय तरी काय आहे,’ असा सवालही ही मंडळी आवर्जुन उपस्थित करतात.

जिल्ह्यातील चित्र असे
तृतीयपंथी घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जिल्ह्यात २००६ मध्ये सर्वेक्षण झाले. त्यावेळी शहरात सुमारे शंभर आणि जिल्ह्यात अडीचशेच्या आसपास तृतीयपंथीयांची नोंद झाली. सद्यस्थितीचा विचार केल्यास ही संख्या किमान दुप्पट नक्की असेल. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पन्नास ते साठ तृतीयपंथीयांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत. महिन्याला पंधराशे रूपये पेन्शनसाठीची प्रक्रियाही सुरू आहे. पण, त्यासाठी फक्त शिधापत्रिका असून, भागत नाही. पॅनकार्ड, आधारकार्डही लागते. त्यामुळे ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत त्यांच्याकडून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


कोट
शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांमध्ये तृतीयपंथीयांना संधीची समानता देण्याबाबतचा शासननिर्णय याच महिन्यात निर्गमित झाला आहे. त्यादृष्टीने आता सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत.
-मयूरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com