
गोडसाखर कामगार बैठक
निवृत्त कामगारांना पंधरावड्यात माहिती द्या
‘गोडसाखर’ कामगार : जिल्हाधिकाऱ्यांचे कारखाना व्यवस्थापनाला आदेश
गडहिंग्लज, ता. १२ : ‘आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यातील (गोडसाखर) निवृत्त कामगारांच्या थकीत देणींच्या वसुलीसाठी सुरु असलेल्या न्यायालयीन दाव्यामध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे १५ दिवसांत द्या’, असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज कारखाना व्यवस्थापनाला दिला.
निवृत्त कामगारांची सर्वच प्रकारच्या देणी थकीत आहेत. त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी म्हणून अडीच वर्षापासून आंदोलन सुरु आहे. निवृत्त कामगार संघटनेकडून वारंवार मागणी केल्यानंतर आज सायंकाळी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, कार्यकारी संचालक औदुंबर ताबे, सचिव मानसिंगराव देसाई यांच्यासह प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कामगार आयुक्त आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. खोत कामगारांची बाजू मांडताना म्हणाले, ‘ब्रिस्क येण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या कालावधीतही निवृत्त कामगारांची देणी थकलेली आहेत. प्रॉव्हिडंड फंडसुद्धा देणे आहे. ब्रिस्क कंपनीकडून या देणींच्या वसुलीचा दावा न्यायालयात सुरु आहे. कारखाना व कामगारांतर्फे कागदपत्रे सादर केल्यास कंपनीकडून ही वसूली शक्य आहे. न्यायालयात आवश्यक असलेली माहिती कारखान्यातून मिळत नाही. कंपनी व कारखान्याकडून प्राव्हीडंड फंड किती देय आहे, हे सुद्धा सांगितले जात नाही.
दरम्यान, डॉ. शहापूरकर यांनी, कारखाना अडचणीत असल्याने सध्या थकीत देणी देणे अशक्य असून आर्थिक परिस्थिती जशी सुधारेल त्यानुसार टप्प्याटप्प्याने देणी देणार असल्याचे सांगितले. कागदपत्र व इतर माहिती संचालक मंडळाशी चर्चा करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर श्री. रेखावार म्हणाले, ‘कारखान्यातून माहितीही मिळत नाही आणि पैसेही दिले जात नाहीत, हे चुकीचे आहे. निवृत्त कामगारांच्या न्यायालयीन दाव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व ठराव, कंपनी येण्यापूर्वी व त्यानंतरच्या कामगारांची थकीत रक्कम आणि प्रॉव्हिडंड फंड किती थकीत आहे याची सर्व माहिती कामगारांना १५ दिवसांत द्यावी. अन्यथा माझ्या एका आदेशाने कारखान्याचे सर्व दप्तर येथे येईल. तत्पूर्वीच कारखान्याने ही माहिती द्यावी.’