राजाराम निवडणूक

राजाराम निवडणूक

लोगो-
राजाराम आखाडा
---

सत्ताधाऱ्यांना ‘कपबशी’, विरोधकांना ‘अंगठी’
---
चिन्हासाठी जोरदार रस्सीखेच; शाब्दीक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे देण्यावरून आज जोरदार रस्सीखेच झाली. दोन्ही बाजूंनी ‘कपबशी’ चिन्हावर कायदेशीर दावा सांगण्यात आला. त्याच वेळी कारखान्याच्या काही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरून झालेल्या शाब्दीक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर दोन तासांनी सत्ताधाऱ्यांना ‘कपबशी’, तर विरोधकांना ‘अंगठी’ चिन्ह देण्यात आले.
‘राजाराम’च्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस संपल्यावर आज उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली. तत्पूर्वी, दोन्ही गटांनी ‘कपबशी’ चिन्हावरच दावा सांगितला. आपल्या गटाच्या १५ उमेदवारांचे अर्ज पहिल्यांदा दाखल झाले होते. त्यातील पहिल्या दहा उमेदवारांनी ‘कपबशी’ आपल्यालाच मिळावी, अशी मागणी विरोधी परिवर्तन पॅनेलने ॲड. केदार लाड व ॲड. पिंगळे यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. यावर सत्तारूढ गटाने आक्षेप घेताना ज्या १५ उमेदवारांचे पहिल्यांदा अर्ज दाखल झाले, त्यापैकी दहा उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरल्याने विरोधकांना ‘कपबशी’ चिन्ह देता येणार नाही, असा दावा सत्तारूढ गटाचे वकील योगेश शहा यांनी केला. यावर सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मोठा युक्तिवाद केला. त्यासाठी काही न्यायालयीन दाखलेही सादर केले. सकाळी साडेअकरा ते दुपारी बारापर्यंत यावर सुनावणी झाली.
तत्पूर्वी, चिन्ह वाटपावेळी कारखान्याचे काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यावर विरोधी आघाडीचे उमेदवार मोहन सालपे यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर कारखाना कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्यावर सुनावणी सुरू झाली. सुनावणी पूर्ण झाल्यावर दोन तासांनी निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी सत्तारूढ गटाला ‘कपबशी’, तर विरोधकांना ‘अंगठी’ चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला.
.............
चौकट
सोशल मीडियावर व्हायरल
चिन्हांचे वाटप होताच दोन्ही गटांकडून सोशल मीडियावर चिन्हे व्हायरल करण्यात आली. विरोधकांनी नातं जपणारी ‘अंगठी’ असे म्हणत चिन्ह व्हायरल केले; तर सत्ताधारी गटाकडून सर्वांना लागते ती ‘कपबशी’ म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या छायाचित्रासह चिन्हही व्हायरल केले.
................
चौकट
सत्ताधाऱ्यांचा आज प्रचार प्रारंभ
सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचा प्रचार प्रारंभ उद्या (ता. १४) सकाळी नऊला वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती मंदिरातून होणार आहे. अलीकडेच झालेल्या वडणगेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर होऊन सदाशिव पाटील-मास्तर गटाची सत्ता आली. त्यातून सत्तारूढ गटाने या गटाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. त्यामुळे प्रचार प्रारंभासाठी वडणगेची निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com