
यात्रेसाठी गिजवणेकरांची लगबग
gad176.jpg
96541
गिजवणे : सोळा वर्षांनी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिराच्या कळसाची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------
यात्रेसाठी गिजवणेकरांची लगबग
१६ वर्षांनी यात्रा; स्वच्छतेसह धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन गतीमान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या गिजवणे गावची श्री महालक्ष्मी यात्रा १६ वर्षांनी १ ते ३ मे अखेर होत आहे. यानिमित्त गावात लगबग सुरु झाली आहे. घरांची डागडुजी, रंगरंगोटी करण्यासह ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता, पाणीपुरवठा, पार्कींग व्यवस्थेचे नियोजन सुरु झाले आहे. महालक्ष्मी यात्रा समितीतर्फे देवीच्या धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात येत असून यात्रेपूर्वी मंदिराचा वास्तूशांती सोहळाही होणार आहे.
शहरापासून अवघ्या एक-दीड किलोमीटरवर असलेल्या गिजवणे ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षापूर्वी बिनविरोध करुन गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तालुक्याला आदर्श घालून दिला. १६ वर्षानंतर यंदा होणारी श्री महालक्ष्मी यात्रासुद्धा सर्वपक्षीय कार्यकर्ते, गावकऱ्यांच्या एकीतून यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. महालक्ष्मी मंदिराची दुरुस्ती, सुधारणा, मंदिराभोवती सभामंडपाचे काम पुर्णत्वाला गेले आहे. यात्रेपूर्वीच वास्तूशांती सोहळा असल्याने हे काम गतीने पूर्ण केले आहे. रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. देवीच्या मूर्तीलाही आकर्षक वज्रलेप करण्याचे कामही दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. यात्रा समितीतर्फे प्रत्येक उंबऱ्यानुसार लोकवर्गणीचे नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.
गावात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय न होण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे नियोजन सुरु केले आहे. स्वच्छता, पाणी, वीजपुरवठा अखंडीत ठेवण्याचे प्रयत्न आहेत. महावितरणच्या सहकार्याने गावात वीजेच्या समस्याही दूर केल्या जात आहेत. पार्कींग व्यवस्थेसह यात्रेसाठी येणाऱ्या दुकानांच्या जागेचेही नियोजन केले जात आहे. यात्रेसाठी गावात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामस्थांकडून मित्रमंडळी, पै पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी पत्रिकांचे नियोजन करण्यात येत आहे. एकाच दिवशी (ता. २) जेवणावळी उठणार असल्याने आचारीपासून टेबल, मंडप, खुर्च्यांची बेगमी करण्यात ग्रामस्थ गुंतले आहेत. घरांची स्वच्छता अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेनिमित्त घरांची डागडुजी, सुधारणा, रंगकामानेही गती घेतली आहे. गावात अशी कामे सुरु असल्याने लाखोची उलाढाल होत आहे. यात्रेतही कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित आहे.
----------------
डिजीटल मुक्त यात्रा
कोणतीही यात्रा, सण, उत्सव म्हटले की गावांमधील चौक डिजीटल फलकांनी वेढले जातात. याचा त्रास वाहनधारकांसह इतरांनाही होत असतो. गिजवणे यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेवून, त्यात डिजीटल फलकांचा अडथळा येवू नये यासाठी ही यात्रा डिजीटल फलकमुक्त करण्याचा गिजवणेकरांनी केलेला निर्धार आदर्शवत मानला जात आहे.