मोदी

मोदी

... तर ‘शिवसेना सहकार पॅनेल’ करू

सुनील मोदी यांचा इशारा ः भाजपला निमंत्रण का? महाविकास आघाडीतील बेबनाव उघड

कोल्हापूर, ता. १९ ः ‘जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. उलट ते भाजपबरोबर चर्चा करत आहेत. त्यांनी आम्हाला चर्चेचे निमंत्रण दिले नाही, तर गुरुवारी (ता.२०) दुपारी २ वाजता आमचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर पॅनेल जाहीर करतील. ‘शिवसेना सहकार पॅनेल’ असे त्याचे नाव असेल,’ असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सुनील मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या महाविकास आघाडीतील बेबनाव उघड झाला आहे. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.

यावेळी मोदी म्हणाले, ‘कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हे आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांना भेटले होते. महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये शिवसैनिकांना (ठाकरे गट) संधी द्या, कारण आपण सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत, अशी आमची मागणी आहे; मात्र आता अर्ज माघारीचा दिवस उजाडला तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने आमच्याशी संपर्क केलेला नाही. चर्चेलाही बोलावले नाही. उलट शिवसेनेला (ठाकरे गट) एक जागा देतो आणि तो एक उमेदवारही आम्ही ठरवतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. याला आमचा पूर्ण विरोध आहे. आमचे संपर्कप्रमुख दुधवडकर जो उमेदवार देतील त्यालाच काँग्रेस, राष्ट्रवादीने पॅनेलमध्ये घेतले पाहिजे. आमच्या १२ शिवसैनिकांनी अर्ज भरलेले आहेत. आम्हाला त्यांच्या पॅनेलमध्ये योग्य ते स्थान मिळाले पाहिजे.’ पत्रकार परिषदेला करवीर तालुका अध्यक्ष तानाजी आंग्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
--------------

...तर विधानसभा, लोकसभेवेळी विचार करावा लागेल

सुनील मोदी म्हणाले, ‘निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. जिल्ह्यातील दोन माजी आमदार आमच्यासोबत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नाराज घटकदेखील सोबत आहेत. सहकारातील निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) स्थान मिळणार नसेल तर आम्हालाही महाविकास आघाडीबद्दल विचार करावा लागेल. विधानसभा, लोकसभा निवडणुकीवेळी आम्हालाही साथ द्यायची की नाही, याचा विचार करावा लागेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com