
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नव्या महाविद्यालयांची ठिकाणे निश्चित
विद्यापीठ लोगो
--
नव्या १८० महाविद्यालयांची ठिकाणे निश्चित
बृहत आराखड्याचा प्रस्ताव तयार; जंबो कमिटी बैठकीत प्राथमिक कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नव्या एकूण १८० महाविद्यालयांची ठिकाणे (बिंदू) निश्चितीची प्राथमिक कार्यवाही आज पूर्ण झाली. विद्यापीठाचा २०२४ ते २०२९ या कालावधीसाठीचा बृहत आराखड्याचा प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव तयार करण्यासाठी या आराखड्याच्या जंबो कमिटीची (मुख्य नियोजन समिती) बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
विद्यापीठ कार्यक्षेत्रात कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, विधि, आर्किटेक्चर, व्यावसायिक आणि कौशल्यविकास अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याचे प्रस्ताव बृहत आराखडा निश्चित करणाऱ्या समितीकडे आले. त्यांची विद्यार्थी संख्या आणि इतर महाविद्यालयांतील अंतर आदी निकषांवर छाननी करण्यात आली. त्यानंतर आज बिंदू निश्चितीसाठी जंबो कमिटीची बैठक दुपारी तीनच्या सुमारास विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सुरू झाली. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हानिहाय प्राप्त झालेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावावर चर्चा करून बिंदू निश्चित करण्यात आले. त्यांचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या अधिकार मंडळांसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर २५ मे रोजीच्या अधिसभेत मांडण्यात येईल. त्यातील सूचनांनुसार प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात येणार आहे. या जंबो कमिटीच्या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषद, अधिसभा सदस्य, संलग्नता विभागाचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयम आदी उपस्थित होते.
..
कोट
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका उच्च शिक्षणाच्यादृष्टीने स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. तेथील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या मुलांना हवे ते शिक्षण त्यांच्या तालुक्यात उपलब्ध व्हावे याउद्देशाने नव्या महाविद्यालयांचे बिंदू निश्चित केले आहेत.
- सिद्धार्थ शिंदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य
..