
राजाराम कारखाना
सत्तारूढ गटाच्या एकाधिकारशाहीला
सभासद कंटाळले ः सतेज पाटील
कोल्हापूर, ता. २० : छत्रपती राजाराम कारखाना जिल्ह्यातील १२ हजार सभासदांचा झाला पाहिजे. जिल्ह्यातील मूळ भूमिपुत्र याचे मालक आहेत. त्यामुळे सभासदांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा कंडका पाडण्याचा निर्धार केला आहे. कारखाना सभासदाभिमुख ठेवण्यासाठी, सभासदांना कारखान्याच्या माध्यमातून अनुदान तत्त्वावर ड्रोन सुविधा, ठिबक सिंचन, पाणंद-रस्ते, ऊस बियाणांसह कृषी सुविधा देण्याचा मानस आहे. त्यामुळे निवडणुकीत सभासद विरोधी पॅनेलला साथ देतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
- सुनील पाटील
*राजाराम कारखाना तुमच्या ताब्यात का द्यायचा?
- जिल्ह्यातील सर्वात जुन्या कारखान्यात सध्या सभासदाभिमुख कारभार होत नाही. सभासदांना उसाचे चार पैसे जास्त मिळावेत, या भूमिकेतून विरोधी पॅनेलद्वारे ही निवडणूक लढवत आहे. राजारामच्या सभासदांना इतर साखर कारखान्याच्या तुलनेत प्रतिटन २०० रुपये कमी दिले जातात, हे वास्तव सर्व सभासदांना समजले आहे.
*‘गोकुळ’चा कारभार चांगला नाही, अशी सत्ताधाऱ्यांकडून टीका होते, याबद्दल काय सांगाल?
-गोकुळमध्ये आमची सत्ता आल्यानंतर जादा भाडे घेणारे महाडिक यांचे टँकर बंद केल्याचे त्यांना दुखणे आहे. काटकसर करूनच म्हैस आणि गाय दूध खरेदीला प्रतिलिटर १० ते ११ रुपयांची वाढ दिली. टीका करणाऱ्यांचा अभ्यास कमी आहे. गोकुळच्या कधीही ५०० कोटींच्या ठेवी नव्हत्या. गोकुळच्या अहवालातही याचा उल्लेख नाही. आम्ही राजाराम कारखाना उसाला दर कमी का देतो? हा प्रश्न विचारल्यानंतर त्याला सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करणारे उत्तर दिले जाते. गोकुळमध्ये आम्ही चुकीचा कारभार करत असेल, तर त्यावर सभासद निर्णय घेतील.
*डी. वाय. पाटील कारखान्यात १२०० किलोचा टन आहे, अशी सत्ताधाऱ्यांकडून टीका होते. त्याबद्दल काय सांगाल?
- वास्तविक राजाराम कारखान्याच्या सभासदांना प्रतिटन २०० रुपये कमी का देता? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक करण्यासाठी पाणंदी का केल्या नाहीत? कारखान्याच्या आतील अवस्था पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येते? कोल्हापुरातील ४ हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद केले नाहीत; पण येलूरचे ६०० सभासद केले, याबद्दल उत्तर देण्याऐवजी डी. वाय. पाटील कारखान्यावर टीका केली जाते. ज्यावेळी डी. वाय. पाटील कारखान्याची निवडणूक लागेल, त्यावेळी हव्या तेवढ्या आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे.
*राजारामचा को-जन तुम्ही तुमच्या पैशातून करणार का? असा सवाल सत्तारूढ गटाने केला आहे, याबद्दल तुमची भूमिका काय?
- हा प्रश्न बालिशपणाचा आहे. खासगी व्यवसायातून ही माणसं मोठी झाल्यामुळे त्यांना सहकार माहिती नाही. सहकारात प्रकल्प राबवताना कर्ज घेऊनच करतो. बँकाही त्याला कर्ज देतात. डिस्टिलरी प्रकल्प उभारणाऱ्या कारखान्यांच्या कर्जाचा व्याज परतावा केंद्र सरकार भरणार होते. मात्र, सत्तारूढ गटाने अर्ज केला नाही. त्यामुळे त्याचा लाभ मिळाला नाही. शासकीय सर्व योजनांचा लाभ घेत हा प्रकल्प उभारला जाईल.
*तुम्ही गोकुळ कर्मचाऱ्यांचा प्रचारासाठी वापर करता का?
- गोकुळमध्ये पूर्वी त्यांची सत्ता होती, त्यावेळी राजाराम कारखान्याची निवडणूक असो किंवा विधानसभा, महापालिकेची. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात होत्या. आम्ही तसा दबाव गोकुळ कर्मचाऱ्यांवर आणत नाही किंवा आणलेला नाही. काहीजण स्वयंस्फूर्तीने येत असतील; पण गोकुळचा वापर राजकारणासाठी करण्याचा कोणताही विषय नाही.
*२९ उमेदवार अवैध होते, असे सत्तारूढकडून सांगितले जात आहे, याबद्दल काय सांगाल?
- सर्जेराव माने पूर्वी महाडिक गटातून चेअरमन होते, त्यावेळी ते पात्र होते. आता ते अपात्र कसे झाले? काही उमेदवारांना जाणीवपूर्वक अवैध ठरविण्याचे षड्यंत्र रचले. सहकारात हा चुकीचा पायंडा पडला आहे.
*ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर गेली आहे का?
- सत्तारूढकडून ही वैयक्तिक पातळीवर निवडणूक घेतली आहे. आम्ही सभासदांच्या हिताचीच चर्चा करत आहे. जिल्ह्यातील हेक्टरी सरासरी ९७ टन उसाचे उत्पन्न होते. यामध्ये, दत्त कारखान्याचे ९६ टन, जवाहरचे ९३, वारणेच ९८ टन आणि राजारामचे ७२ टन आहे. राजारामच्या सभासदांचे हेक्टरी उत्पन्न ७२ वरून ८५ टन आणि ८५ वरून ९० टनापर्यंत नेण्यासाठी तीन वर्षांचे नियोजन केले जाईल. यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूटकडून चांगले बियाणे सभासदांना दिले जाईल. राजारामची स्वत:ची माती परीक्षण प्रयोगशाळा उभारली जाणार आहे.