अहिर यांनी कामाची छाप उमटवली

अहिर यांनी कामाची छाप उमटवली

ajr211.jpg
97593
आजरा ः येथील तहसील कार्यालयात मावळते तहसीलदार विकास अहिर यांचा सत्कार करताना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, नूतन तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन आदी.
------------------
अहिर यांनी कामाची छाप उमटवली
प्रांताधिकारी बारवे यांच्याकडून गौरव; तहसीलदार विकास अहिर यांचा सदिच्छा समारंभ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः तहसीलदार विकास अहिर यांनी जनताभिमुख काम करण्याबरोबरच प्रशासन गतिमान करून आजऱ्यात आपल्या कामाची अमिट छाप उमटवली. त्यांनी तळागाळातील माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून काम केले. तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. आज त्यांच्या सदिच्छासाठी जमलेली मंडळी पाहता ते लोकप्रिय तहसीलदार होते असेच म्हणावे लागेल, असे गौरवोद्‍गार भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी काढले.
येथील तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आजरेकरांच्या वतीने मावळते तहसीलदार विकास अहिर यांचा सत्कार झाला. यावेळी श्रीमती बारवे बोलत होत्या. आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नूतन तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, पाटबंधारे अधिकारी विजयसिंह राठोड, वीज मंडळाचे अधिकारी अनिल कलगुटगी आदी प्रमुख उपस्थित होते.
नूतन तहसीलदार श्री. माने म्हणाले, ‘तहसीलदार अहिर यांना कॉलेज जीवनापासून ओळखतो. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी लोकहिताचे निर्णय घेऊन प्रशासन जनतेपर्यंत पोहचवले. त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांच्या कामाची जबाबदारी माझ्यावर पडली असून हे एक आव्हान आहे. ते पार पाडण्याचा प्रयत्न करेन.’ सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटील म्हणाले, ‘तहसीलदार अहिर यांनी चौकटीबाहेर जाऊन काम केले आहे. तालुक्यात बांबूची चळवळ उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.’ तालुका कृषी अधिकारी श्री. मोमीन, माजी सभापती वसंतराव धुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटील, गडहिंग्लज बाजार समिती सदस्य युवराज पोवार, समीर पारदे, संजय तर्डेकर, नारायण भडांगे, मुरलीधर कुंभार, संजय येसादे यांची भाषणे झाली. माजी उपसभापती शिरीष देसाई, दीपक देसाई, संभाजी पाटील, राजू मुरुकुटे, बापू निऊंगरे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, डी. डी. कोळी, विकास कोलते, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. तलाठी वंदना शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी आभार मानले.
------------
आजऱ्याशी नाळ कायम ः अहिर
तहसीलदार अहिर म्हणाले, ‘आजरेकरांसाठी चांगले काम करता आले. त्यांनीही मला भरभरून दिले. त्यांच्या ऋणात राहणे पसंत करीन. बदली झाली तरीही आजऱ्याशी नाळ कायम राहील.’ यावेळी त्यांचा कंठ दाटून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com