
खंडोबा तालीम मंडळ उपांत्य फेरीत
‘इंगवले सर’ फुटबॉल स्पर्धा
97857
कोल्हापूर : झुंजार क्लब आयोजित इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेत ‘फुलेवाडी’ विरूध्द ‘खंडोबा’ सामन्यातील एक क्षण.
खंडोबा तालीम उपांत्य फेरीत
‘फुलेवाडी’वर १ विरुद्ध शुन्य गोल फरकाने मात
कोल्हापूर, ता. २२ : झुंजार क्लब आयोजित इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघावर १ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
सामन्याची सुरूवात फुलेवाडी संघाने आक्रमक करत गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले. मात्र खंडोबा संघाच्या बचाव फळीने उत्कृष्ट खेळ करत फुलेवाडी संघाची आक्रमणे रोखली. दरम्यान खंडोबा संघाच्या सेफ याने गोल जाळी भेदली मात्र पंचांनी ऑफसाइड दिली. लगेचच फुलेवाडी संघाच्या खेळाडूंनी चेंडूवर ताबा मिळवत खंडोबा संघाच्या गोल जाळीवर आक्रमण केले. या वेळी खंडोबा संघाचा गोलरक्षक निखिल खन्ना यांच्या हातून चेंडू निसटल्याने संधी निर्माण झाली; मात्र त्याच्या चिवट प्रयत्नामुळे गोल होऊ शकला नाही. या नंतर दोन्ही संघाकडू झालेले प्रयत्न फोल ठरले. पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला. फुलेवाडी संघाच्या स्टॅनली याने मारलेला फटका खंडोबा संघाचा गोल रक्षक निखिल खन्ना याने अडवला. थोड्याच वेळात खंडोबा संघाने आक्रमण करत संकेत मेढे याने फटकावलेला चेंडू फुलेवाडीचा गोल रक्षक रणवीर खालकर याने अडवला. चुरशीचा ठरलेल्या सामन्यात अधिकच्या वेळेत संकेत मेढे याने गोल नोंदवत खंडोबा संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.
----------------
सामनावीर
निखिल खन्ना - खंडोबा तालीम मंडळ
लढवय्या
अरबाज पेंढारी - फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
आजचा सामना
४ वाजता - पीटीएम- अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ