
आठवडा बाजार
फोटो क्रमांक : gad२३९.jpg
97946
गडहिंग्लज : मच्छी बाजारात कमी आवकेने दर वाढले असून ग्राहकांअभावी शुकशुकाट होता. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------
आवक घटल्याने मासे वधारले
बटाटे, आले तेजीत; पालेभाज्या रोडावल्या; बकऱ्यांना मागणी, कांदा स्थिर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : य़ेथील मटण मार्केटमध्ये आवक घटल्याने समुद्री माश्यांचे दर वधारले आहेत. सरासरी २० ते ३० टक्के दर वाढले आहेत. भाजी मंडईत बटाटे, आल्याचे दर तेजीत आहेत. तुलनेत कांद्याचे भाव स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक रोडावल्याने दर वधारले आहेत. काजू बियांची आवक सुरू झाली आहे. जनावरांच्या बाजारात परिसरातील यात्रामुळे बकऱ्यांना मागणी असून बैल, म्हैशींची आवक जेमतेम आहे.
पंधरवड्यापासून मच्छी बाजारात कोकणातून येणाऱ्या समुद्री माश्यांची आवक घटली आहे. उन्हाळ्यामुळे सरासरी पन्नास टक्के आवक कमी झाल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. त्यामुळे सुरमई, पापलेटचे दर वाढले आहेत. किलोमागे २०० ते ३०० रुपयांनी दर वाढले आहेत. नदी, तलावातील माश्यांची आवक स्थिर आहे. किलोचे दर : सुरमई १०००, पापलेट १२५०, रावस ५००, प्रॅांझ ६००, बोंबील ३००, कटला, मांदेली २००, रहू १६०, बांगडा १६०-२०० रुपये.
हिरवी मिरची, ढब्बू, दिडगा, गवार यांची आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. सरासरी ६० ते ८० रु. किलो असा दर आहे. टोमॅटो, वांगी, कोबीचे दर कमीच आहेत. २० ते ३० रुपये किलो असा दर आहे. उष्म्यामुळे कोथिंबीर, पालेभाज्यांची आवक कमी आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. पेंडीचा १५ ते २० रु. दर आहे. शेवगा, कांदापातचा दरही मागणीमुळे अधिक आहे. कांद्याचा दर स्थिर असून क्विंटलचा ६०० ते ११०० तर किळकोळ बाजारात किलोचा १० ते १५ रु. किलो दर आहे. बटाट्याच्या दरात क्विंटलमागे २०० रु. दर वधारल्याचे विक्रेते सिद्राम नेवडे यांनी सांगितले. बटाटा १४००- १८०० क्विंटल तर किलोचा २० ते २५ किलोचा भाव आहे. सातारा परिसरातून येणाऱ्या आल्याचा दर किलोमागे १५० रु. आहे.
फळबाजारात द्राक्षांची आवक असून ४० ते ५० रुपये किलो दर आहे. सफरचंद १६०- २००, डाळींब, चिक्कू, मोसंबी ८०- १०० रुपये किलो आहेत. केळी ४० ते ६० रुपये डझन आहेत. बाजार समिती आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात स्थानिक यात्रांमुळे बकऱ्यांना मागणी जास्त आहे. दहा ते पंधरा हजारापर्यंत दर आहेत. सत्तरहून अधिक आवक होती. म्हैशी आणि बैलांची आवक कमी असून ३० ते ९० हजारापर्यंत दर आहेत.
चौकट..
चिंचेची आवक वाढली
चिंचेची आवक वाढली आहे. गेल्या महिन्यापासून ग्रामीणसह लगतच्या सीमाभागातून ही आवक सुरु आहे. किलोचा प्रतीनुसार १५ ते २५ रुपयापर्यंत दर आहे. काजूबिया १००-११० रुपये किलो आहेत.