राजाराम मतदान

राजाराम मतदान

‘राजाराम’साठी चुरशीने ९१ टक्के मतदान
---
उद्या निकाल; टोप, शिरोलीतील तणाव वगळता शांततेत मतदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्यासाठी आज चुरशीने ९१.१२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २५) रमण मळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठपासून सुरू होईल. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाच्या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.
दरम्यान, टोप येथे येल्लूरच्या सभासदांची नावे असल्यावरून झालेला तणाव, शिरोलीत बोगस मतदान करताना दोघांना पकडल्याचा प्रकार व सेंट झेवियर्समध्ये संस्था गटातील विरोधी गटाच्या उमेदवारालाच रोखल्याने झालेली किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत झाले. सर्वच मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील मतदान केंद्रावर शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले होते.
राजाराम कारखान्यासाठी उत्पादक गटातील २० व संस्था गटातील एक अशा २१ जागांसाठी मतदान झाले. दोन अपक्षांसह ४४ उमेदवार रिंगणात आहेत. उत्पादक गटातील १३ हजार ५३८ मतदारांपैकी १२ हजार ३३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ९१.१२ टक्के झाली. माजी आमदार महादेवराव महाडिक उमेदवार असलेल्या संस्था गटात १२९ पैकी १२८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्था गटात तब्बल ९९ टक्के मतदान झाल्याने चुरस वाढली आहे.
जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यांतील १२२ गावांतील ५८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक चुरशीची असल्याने व दोन्ही गट प्रबळ असल्याने सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही गटांनी बस, चारचाकीसह रिक्षाची सोय केली होती. अंगाची लाही-लाही करणाऱ्या रखरखत्या उन्हातही मतदानासाठी मोठा प्रतिसाद सर्वच केंद्रांवर पाहायला मिळाला.
टोप (ता. हातकणंगले) येथे येल्लूरचे सभासद नोंद असल्यावरून विरोधकांनी त्यांना मतदानापासून रोखले. त्यावरून या केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे दुसऱ्याचे आधारकार्ड वापरून मतदान करण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याला विरोधकांनी रोखले. त्याच्याकडे दुसरे ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावरून किरकोळ वाद झाला. या दोन घटना वगळता अन्य केंद्रांवर कार्यकर्त्यांची मतदार बाहेर काढण्यासाठीची ईर्ष्या, त्यांना केंद्रावर आणल्यावर घरापर्यंत सोडण्यासाठी सुरू असलेली धावपळ आणि केंद्राबाहेर नेते, कार्यकर्त्यांची गर्दी असे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
पहिल्या दोन तासांतच १३ हजार ५३८ सभासदांपैकी चार हजार ९०६ म्हणजे ३६ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरच्या दोन तासांत चार हजार ३९३ सभासदांचे मिळून नऊ हजार ३०९, तर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत १२ हजार २२१ सभासदांनी मतदान केले. चारपर्यंतच ९०.२७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत ९१.१२ टक्के मतदान झाले.
...............
असे झाले मतदान
वेळ *झालेले मतदान *टक्केवारी
सकाळी ८ ते दुपारी १२ *९,३०९ *६८.७६
सकाळी ८ ते दुपारी २ *११,२२१ *८२.८९
सकाळी ८ ते दुपारी ४ *१२,२०१ *९०.१२
सकाळी ८ ते सायंकाळी ५ *१३,५३८ *९१.१२

एकूण झालेले मतदान ः १३ हजार ५३८
...........

महाडिकांचे केंद्रावर ठाण
सकाळपासूनच संस्था गटाचे मतदान असलेल्या सेंट झेवियर्स शाळेत माजी आमदार महादेवराव महाडिक ठाण मांडून होते. दुपारी एकनंतर ते स्वतःचे मतदान करण्यासाठी गेले. त्यानंतर आमदार सतेज पाटील हे संस्था गटातील मतदारांसह दाखल झाले. श्री. महाडिक यांनी शिरोलीत, तर अमल महाडिक यांनी पेठ वडगावमध्ये मतदानाचा हक्क बजावला. महाडिक कुटुंबातील इतर सदस्यांनी शिरोलीत मतदान केले. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार सतेज पाटील, डॉ. संजय पाटील व कुटुंबीयांनी लाईन बझार येथील भाऊसाहेब महागावकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.
.............

नेत्यांची मोठी फळी कार्यरत
या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांची फळी कार्यरत होती. सत्तारूढ गटाकडून अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, स्वतः महादेवराव महाडिक, सम्राट महाडिक, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील यांनी, तर विरोधकांकडून आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील व माजी नगरसेवक व कार्यकर्ते मैदानात होते. खासदार महाडिक, अमल महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी बहुतांश केंद्रांना भेटी देत आपापल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले.
.............

बावड्यात ९४ टक्के मतदान
कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा गावात एकूण ९७५ मतदार आहेत. चार केंद्रांवर यापैकी ९१९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ९४ टक्के झाली.
.............

फोटो-०४७२८
महाडिक-संजय पाटील आमनेसामने
‘राजाराम’च्या निवडणुकीतील मतदानावेळी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व खासदार धनंजय महाडिक हे लाईन बझार येथील मतदान केंद्रावर एकाचवेळी आले. मतदान केंद्रांना भेटी देताना हे दोन नेते आमनेसामने आले; पण त्यांची नजरानजरही झाली नाही. कळंबा केंद्रावर मात्र खासदार महाडिक व आमदार ऋतुराज पाटील समोरासमोर आल्यावर एकमेकांना त्यांनी हात केला.
............

तालुका *एकूण मतदान *झालेले मतदान
हातकणंगले *५,४११ *४,८६८
करवीर *५,३३६ *४,८६३
शाहूवाडी *१९२ *१७२
पन्हाळा *७४४ *७१४
कागल *१०५ *९४
राधानगरी *१,२१३ *१,१२६
गगनबावडा *४०४ *३७१
संस्था गट *१२९ *१२८
........................................
एकूण *१३,५३८ *१२,३३६

००००
कसबा बावड्यात चुरस
कसबा बावड्यातील भाऊसाहेब महागावकर विद्यामंदिर मतदान केंद्रावर सकाळपासूनच चुरस अनुभवायला मिळाली. विरोधी गटाचे दोन, तर सत्ताधारी गटाचा एक तंबू येथे उभारला होता. त्यात कार्यकर्त्यांची वर्दळ होती. मतदारांना ते मतदान करण्यासाठी आवाहन करीत होते. विरोधी गटातील माजी नगरसेवक मोहन सालपे सकाळपासून मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. सकाळी दहाच्या सुमारास डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील मतदान केंद्रावर आले. ते केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर मतदारांना मतदानासाठी आवाहन करीत थांबले. खासदार धनंजय महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम व सुनील कदम थोड्या वेळाने येथे आले. ते थेट मतदान केंद्रात गेले. तेथून परतल्यावर सेंट झेवियर्स मतदान केंद्राकडे रवाना झाले. सम्राट महाडिक यांनीही मतदान केंद्राला भेट दिली. शांतादेवी डी. पाटील व वैजयंती पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार सतेज पाटील यांनी दुपारी एकच्या सुमारास केंद्रावर येऊन मतदान केले. सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत मतदान केंद्रवरील पहिल्या खोलीत २५० पैकी १९८, दुसऱ्या २५० पैकी १९७, तिसऱ्या २५० पैकी २०६, तर चौथ्या खोलीत २२५ पैकी १७७ मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग संथ राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com